सातारा : जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुचे महत्त्व विशद करण्यात आले आहे अशा जन्म देणाऱ्या आई, जन्माला घालणारे वडील त्यानंतर शाळेत शिकवणारे शिक्षक आणि संपूर्ण जीवनाला वळण लावणाऱ्या विविध क्षेत्रातील तसेच व्यवसायातील नोकरी धंद्यातील गुरूंना आदरपूर्वक वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमेला गुरुवंदन, गुरु पूजन केले जाते. भारतीय संस्कृतीने ही मोठी आध्यात्मिक परंपरा हजारो वर्षे जपली आहे.
आषाढ महिन्यातील गुरुवारी या गुरुपौर्णिमेनिमित्त सातारा जिल्ह्यातील विविध धार्मिक तीर्थक्षेत्रे तसेच गुरूंचा महिमा असणाऱ्या ठिकाणी ही गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोंदवले बुद्रुक येथे रामनामाची महती सांगून श्री राम नामाचा जप संपूर्ण आयुष्यभर जपत रहा असा धार्मिक संदेश देणाऱ्या आणि मागील शतकापासून आजपर्यंत करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आणि अध्यात्मिक गुरु समजल्या जाणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी दर्शन घेऊन रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. गोंदवले येथील समाधी मंदिर परिसरात हजारो भाविकांनी दर्शनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने या निमित्त गोंदवले परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाद्वारे वळवण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील श्रीक्षेत्र सज्जनगड येथे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिरात ही गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सज्जनगडावर ही भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्या नजीकच्या श्रीक्षेत्र नारायणपूर येथे नारायण अण्णा महाराज यांच्या एकमुखी दत्त मंदिरात ही भाविकांनी दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष गर्दी केली होती. खटाव तालुक्यातील श्री संत सरूबाई यांच्या आश्रमातही भाविकांनी दर्शनासाठी गुरुपौर्णिमे निमित्त दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या सातारा शहरातील श्री स्वामी समर्थ मठ फुटका तलाव नजीक तसेच समर्थ मंदिर परिसरातील श्रीराम कृष्ण सेवा मंडळाच्या श्रीरामकृष्ण आश्रम, शाहूपुरी गेंडामाळ परिसरातील शेगावचे निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात तसेच गोडोली परिसरातील साईबाबा मंदिरात ही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रतापगंज पेठ येथील मुतालिक दत्त मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिराला विशेष विद्युत रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. राजपथावरील पोलीस कर्मणूक केंद्र समोरील आनंदवाडी दत्त मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुला वंदन करण्यासाठी अनेक शाळांमधून विशेष कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये शालेय मुला-मुलींनी गुरुवंदना करीत आपल्या शिक्षकांना गुलाब पुष्प तसेच भेटवस्तू देऊन अभिवादन केले.
सातारा शहरात गुरुपौर्णिमेनिमित्त फुलांचे तसेच हारांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत होते. गुरु पूजनासाठी लागणारे गुलाब, शेवंती, चाफा आदी फुलांना विशेष मागणी होती. तसेच सध्याच्या तीव्र पावसामुळे फुलांची आवक कमी झाल्यामुळे या फुलांचे भाव गगनाला भिडल्याचे दिसून येत होते.
शहरातील मिठाई व्यावसायिकांकडे गुरु पूजनासाठी लागणाऱ्या कंदी पेढे, आंबा बर्फी तसेच विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठीही भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते.
सातारा शहरातील श्रीरामकृष्ण आश्रम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी विशेष षोडशोपचार पूजा, होम हवन सायंकाळी श्रीरामकृष्ण नाम संकीर्तन, भजन, तसेच गुरु महात्म्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी महाआरतीनंतर द्रोणातून प्रसादाचे वितरण करण्यात आले अशी माहिती श्री रामकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली.