कोण होणार सातारचा नगराध्यक्ष.....; बंडखोर ठरणार जॉईंट किलर ; काऊंटडाऊन सुरू, बंडखोर उमेदवारांनीही उडवला धुराळा

by Team Satara Today | published on : 30 November 2025


सातारा:  सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला असून आरोप प्रत्यारोपामुळे ऐन थंडीत वातावरण गरम झाले आहे. महाराष्ट्रात प्रथमच खा. उदयनराजे भोसले, नितीन पाटील या दोन खासदारांसह पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी दिग्गज नेते प्रचारात सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. सातारचा नगराध्यक्ष कोण असेल? याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीत दोन्हीही राजांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली असल्यामुळे बंडखोर हेच जॉईंट किलर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुमारे सहा वर्षानंतर सातारा नगरपालिकेसाठीच्या ५० जागांसाठी निवडणूक होत असून ही निवडणूक मनोमिलनाच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याची घोषणा प्रत्यक्षात करण्यात आली असली तरी सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह ५० तर महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासह ४५ ठिकाणी उमेदवार दिले. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनाही मनोमिलनाच्या माध्यमातून उमेदवार निश्चित करताना तारेवरची कसरत करावी लागल्यामुळे दोन्हीही आघाडीतील बंडोबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.  परिणामी गेल्या आठ दिवसांपासून प्रचारासाठी नेत्यांना पायाला भिंगरी बांधावी लागली. दोन दिवसांपूर्वी सातारा शहरातील गांधी मैदान येथे महाविकास आघाडीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी साताऱ्याचा विकास नाही केला तर राजकारण सोडेन, असे सांगत  महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुलवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरात ठिकठिकाणी पदयात्रांवर भर देत साताऱ्याचा विकास भाजपच करू शकतो, असा विश्वास सातारकर नागरिकांना दिला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टिकेवरही त्यांनी भाष्य केले.

बंडखोर उमेदवारांनीही उडवला धुराळा

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत २५ पैकी २४ प्रभागात बंडखोरी मोठ्या प्रमाणावर उफाळून आली आहे. त्यामध्ये अनेक जण तुल्यबळ आणि ताकतीचे उमेदवार समजले जात आहेत. आरपारची लढाई मत या निवडणुकीत बंडखोर उमेदवारांनीही पदयात्रा, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचारात धुराळा उडवल्या असल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. सद्य परिस्थिती पाहता काही बंडखोरांना नगरसेवक पदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेच बंडखोर उमेदवार जॉईंट किलरही ठरू शकतात.

शिवेंद्रसिंहराजे यांनी अमोल मोहिते यांच्यासाठी लावली ताकद

सातारचे नगराध्यक्षपद नगर विकास आघाडीकडे ठेवण्यात यश मिळवल्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या विजयासाठी ताकद लावल्याचे दिसून येत आहे. सातारा शहराचा विकास करणे आणि नागरिकांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवणे यासाठी मी कायम कटीबद्ध आहे. शहराच्या विकासाची धमक फक्त भाजपा मध्येच असून सातारकरांनी अमोल मोहिते यांना भक्कम साथ द्यावी असे आवाहन ते ठिकठिकाणी करत असल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी कोणत्याही परिस्थितीत अमोल मोहिते यांना निवडून आणण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होते.

सौ. सुवर्णा पाटील यांच्यासाठी महायुतीचे देव पाण्यात

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव ठाकरे शिवसेना ताकतीने उतरली असून सौ. सुवर्णा पाटील यांच्या रूपाने साताराच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार दिला आहे. सौ. सुवर्णा पाटील यांचा गेल्या दहा वर्षातील कामाचा आवाका पाहता नगराध्यक्ष पदासाठी विशेष करून अमोल मोहिते आणि सौ. सुवर्णा पाटील यांच्यात काट्याची टक्कर होऊ शकते. सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी महायुतीने या निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कोण होणार सातारचा नगराध्यक्ष? याबाबतची उत्सुकता कमालीची वाढली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुठे नेऊन ठेवला आहे सातारा माझा....; शहरात ठिकठिकाणी बंद पडलेल्या वाहनांचा खच ; कुठे आहे शहर वाहतूक शाखा !
पुढील बातमी
“साताऱ्यात गुन्हेगारीला ‘नो एंट्री’! पालिका निवडणुकी पूर्वी ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार

संबंधित बातम्या