पुणे : जैन बोर्डिंगप्रकरणी जो शब्द दिला होता तो मी पाळला आहे. जैन मुनी गुप्तीनंदीजी महाराज यांच्या विनंतीवरून मी या प्रकरणात उतरलो होतो. त्यांचे सर्व म्हणणेही मी ऐकून घेतले होते. त्यावेळी जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी दिलं होतं. अखेर धर्मादाय आयुक्तांनी आजच्या सुनावणीत जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द केला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हे प्रकरण सुरू असताना जैन बांधवांनी कुठंही माझं नाव घेतलं नाही. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सुनावणीतही माझं नाव आले नाही. तरीही माझ्यावर आरोप-प्रत्यारोप झाले. आता पुढे केव्हा तरी या व्यवहाराशी निगडित लोकांशी मी संवाद साधणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातील व्यवहार धर्मदाय आयुक्तांनी गुरुवारी रद्द केला. तत्पूर्वी या प्रकरणात शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
मोहोळ म्हणाले, मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत आहे. हे नातं आजचं नाही, तर गेल्या 30 वर्षांचं आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तीने माझ्यावर अविश्वास दाखवला नाही. काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्सर माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
मोहोळ म्हणाले, गुप्तीनंदीजी महाराज व जैन समाजाला मी जो शब्द दिला होता तो मी पाळला आहे. काहींनी स्वार्थ साधण्यासाठी माझं नाव यात ओढलं. मी वेळ आल्यावर सर्व वस्तुस्थिती समाजासमोर मांडेन. दरम्यान, जमीन व्यवहार रद्द झाल्यानंतर मोहोळ यांनी सोशल मीडियावरही आपली भावना व्यक्त केली.
‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल,’ हा भगवान महावीरांसमोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या निकालाने पूर्ण झाला,” अशी पोस्ट मोहोळ यांनी शेअर केली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. “बोर्डिंगचा व्यवहार दोन्ही बाजूंनी रद्द झाल्याने जैन समाजाच्या अपेक्षांनुसार निर्णय झाला आहे, आणि तेही आपण शब्द दिलेल्या तारखेच्या आधीच,” असे मोहोळ म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
