सातारा : ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा देताना ग्राहक सेवेसाठीच्या कृती मानकांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासोबतच ग्राहक सेवेचा हा डोलारा सांभाळण्यासाठी कंपनीच्या 100 टक्के महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत करावे. बिलिंग व वसूलीतील अकार्यक्षमता ही गंभीर बाब आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलाचे नुकसान होत आहे. कुठल्याही परिस्थितीत कंपनीचे आर्थिक नुकसान खपवून घेतले जाणार नाही. तेंव्हा बिलिंग व वसूली कार्यक्षमतेत सुधारणा करा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिला.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवार, दि.8 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर व बारामती परिमंडलाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस मुख्य अभियंता धर्मराज पेठकर (बारामती) व स्वप्निल काटकर (कोल्हापूर), अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर (सातारा), सुनिल माने (सोलापूर), दीपक लहामगे (बारामती), गणपत लटपटे (कोल्हापूर), अमित बोकील (सांगली) यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस सर्व विभागाचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
या बैठकीत श्री.खंदारे यांनी दैनंदिन कामकाज विषय व प्रगतीपथावरील योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने बिलिंग व वसूली कार्यक्षमता, फिडरनिहाय वीज हानी, प्रलंबित नवीन वीजजोडण्या, कपॅसिटर बँक बसविणे, औद्योगिक भागातील खंडित वीज पुरवठा, औद्योगिक ग्राहकांच्या स्वागत कक्षाच्या बैठका, पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वीज बंद बाबत तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी विभागनिहाय आढावा घेताना कंपनीचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बिलिंग व वसूली कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. यात सुधारणा दिसून नाही आल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सेवेच्या कृती मानकानुसार विहित कालमर्यादेत नवीन वीज जोडणी द्यावी. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे श्री. खंदारे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्प कामांचा आढावा घेऊन निर्धारित कालावधीत ही कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सबंधित एजन्सीकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश श्री. खंदारे यांनी दिले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी व योजनेचे येत्या मार्च 2026 पर्यंतचे कोल्हापूर परिमंडलाचे 33 हजार 711 तर बारामती 37 हजार 541 इतके उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना श्री. खंदारे यांनी केली.
_______