सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाने गुरुवारी (दि. 6) दोन ठिकाणी कारवाया करून, महावितरणचा लाइनमन आणि वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवायांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पहिल्या कारवाईत महावितरण कंपनीचा दहिवडी येथील लाइनमन राहुल अंगदराव महालिंगे याला व्यावसायिक विद्युत कनेक्शन जोडण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. दुसरी कारवाईत वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयातील लिपिक प्रदीप सर्जेराव सावंत याच्यावर करण्यात आली. शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेताना सावंत याला रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, महावितरण कंपनीच्या दहिवडी (ता. माण) येथील कार्यालयातील लाइनमन महालिंगे याने वीज जोडणीसाठी लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून, महालिंगे याला लाच स्वीकारताना पकडले. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयातील लिपिक सावंत याला दीड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज प्रक्रियेसाठी लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.