एकाचा चाकूने भोकसून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा; कराड न्यायालयाचा निकाल

by Team Satara Today | published on : 08 October 2025


सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) - किरकोळ कारणावरून एकाचा चाकूने भोकसून खून केल्याप्रकरणी रोहिदास बाळकृष्ण सावंत (रा. चिंचणी, ता. कराड याला कराडचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. या खटल्यात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी डॉ. अश्विनी पद्माकर महामुनी यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचणी, ता. कराड येथील वरदायिनी मंदिरात गावकर्‍यांनी दि. 24 जुलै 2017 रोजी भंडारा आयोजित केला होता. या भंडार्‍यावेळी आरोपी रोहिदास सावंत दारूच्या नशेत आला. भातात आमटी का वाढत नाही, असे म्हणून त्याने भांड्यातील आमटी ओतून दिली. त्याला महेश पवार यांनी अटकाव केल्यावर सावंतने त्यांच्याबरोबर बाचाबाची केली. गावकर्‍यांनी मध्यस्थी करून सावंतला घरी पाठवले. मात्र, तासाभरानंतर रोहिदास सावंत हा चाकू घेऊन, तेथे आला. त्याने महेश पवार यांना शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अमोल अशोक पवार (वय 34) हे सावंतला समजावून सांगत असताना, तुला आणि तुझ्या भावाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून सावंतने अमोल पवार यांच्यावर चाकूने तीन वार केले. महेश पवार हे मध्ये आले असता, त्यांच्यावरही सावंतने चाकूचा वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या अमोल पवार यांना कराड येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे, उपचारादरम्यान दि. 27 जुलै 2018 रोजी अमोल पवार यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात रोहिदास सावंतवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. ए. भोसले यांनी उर्वरित तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याचे कामकाज कराडचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. या खटल्यात 21 साक्षीदार तपासण्यात आले. अ‍ॅड. जाधव यांनी इतर काही खटल्यांचे दाखले न्यायालयात दिले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपासी अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी ग्राह्य मानून, जोशी यांनी आरोपी रोहिदास बाळकृष्ण सावंतला जन्मठेप, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात न्यायालयाने मयताच्या नातेवाइकांनाही नुकसान भरपाईची तजवीज ठेवली आहे. खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षास उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पी. एच. कार्वेकर आणि पी. ए. पाटील यांनी सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; खंडाळा पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
शिक्षकांच्या मनमानीमुळे संतप्त ग्रामस्थांनी करंजखोपमध्ये शाळेला ठोकले टाळे

संबंधित बातम्या