सातारा,, दि. १७ : आवाज कोणाचा शिवसेनेचा, उद्धव साहेबांचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अशा घोषणा देत शिवसेनेच्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ परिसरात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उबाठाच्या कृषी विभागाचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, सातारचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी राज्य सरकारला ठणकावत संबंधित समाजकंटकास पकडून आमच्या हवाली करा, असा इशारा दिला आहे.
प्रताप जाधव म्हणाले, स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळयाची विटंबना करण्याचे धाडस एका विकृताने केले आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन करत आहोत. येथे निषेध करण्याचे कारण एवढेच पालकमंत्री इथले आहेत. महाराष्ट्र किती जागृत आहे. महाराष्ट्र किती शाबूत आहे. हे या कृत्यावरुन दिसते. शिवसेना असल्या कृत्यांना दाद देत नाही. उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितले आहे, शांतता राखा, राज्यात अशा घटना घडत असल्याने हे सरकार निष्क्रीय आहे, असा आरोप त्यांनी केला.
गणेश अहिवळे म्हणाले, शिवसेना पक्षाच्या मॉ साहेबांच्या पुतळयाची विटंबना करण्याचे भ्याड कृत्य एका समाजकंटकांकडून झाले आहे. हे राज्याच्या कुणाच्या हातात आहे. हे अशा घडलेल्या घटनांवरुन दिसत आहे. आमचे उद्धवसाहेब ठाकरे, संजय राऊत हे कणखर नेते आहेत. त्यांची वाढती प्रतिष्ठा डोळयात खुपत आहे. म्हणून असले कृत्य घडवून आणले जात आहे. राज्य सरकारने आमच्या ताब्यात त्या समाजकंटकाला अटक करुन द्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी रमेश बोराटेसह इतर उपस्थित होते.