सातारा : किल्ले अजिंक्यतारा येथे एक युवक जीवन संपवण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी धाव घेवून त्याला वाचवले. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून युवकाने टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र पोलिसांमुळे त्याचे प्राण वाचले.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांना अशी माहिती मिळाली की, किल्ले अजिंक्यतारा येथे दक्षिण दरवाजा येथे एक युवक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने थांबला आहे. पोनि राजेंद्र मस्के यांनी तत्काळ पोलिसांचे एक पथक किल्ल्यावर पाठवले. यामध्ये पीसीआर 1, बीट मार्शल 1, पोलिसांचे डीबी पथक, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे डीबी पथक असे सुमारे 15 हून अधिक पोलिस होते. ते अजिंक्यतार्यावरील दक्षिण दरवाजा परिसरात युवकाचा शोध घेवू लागले. त्यावेळी एक युवक किल्ल्याच्या कड्यावरती आत्महत्या करण्याच्या तयारीत होता.
नागरिक, पोलिस संंबंधित युवकाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. सुमारे अर्धातास युवकाला समजावत असताना त्याचे लक्ष विचलित केले. यावेळी पोलिस अनिकेत बनकर व महिला पोलिस स्नेहल महाडिक यांनी युवकाला समजावून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या युवकाला शांत करुन त्याचे समुपदेशन केले. पत्नीसोबत झालेल्या वादातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना फोन करुन बोलावून घेतले व सायंकाळी उशिरा त्यांच्या ताब्यात दिले. आत्महत्या करायला निघालेला युवक मूळचा सातारा तालुक्यातील असून, सध्या विलासपूर परिसरात राहत आहे. तो एका हॉटेलमध्ये कामाला आहे. कौटुंबिक वादातून गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ आहे. यातूनच गुरुवारी टोकाचे पाऊल उचलले होते; मात्र शहर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.