दहिवडी : येथील पोलिस ठाणे हे सीईआयआर पोर्टलचा वापर करून मोबाईल हस्तगत करण्यात सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे यांचा पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. दराडे यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून सीईआयआर पोर्टलचे काम पाहणारे पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानुसार नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.
पोर्टलच्या साहाय्याने गहाळ झालेले मोबाईल हे राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हैदराबाद, जामखेड, उस्मानाबाद, सांगली, पंढरपूर, मुंबई, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर येथून परत मिळविण्यात आले. जानेवारी २०२५ ते आजअखेर एकूण १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ७७ मोबाईल हस्तगत करून ते परत करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिस ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.
कारवाईत पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलिस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी सहभाग घेतला.