हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत

आमदार योगेश टिळेकर यांचे सातार्‍यात बैठकांच्या आयोजन

by Team Satara Today | published on : 04 October 2024


सातारा : भाजपचे माजी आमदार महेश टिळेकर यांच्या संकल्पनेतील हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातार्‍यामध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. येथील शिवतीर्थावर फटाक्यांची आतषबाजी करून फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत झाले. शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बहुजन समाजातील अनेक वंचित घटकांचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता या सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी आमदार महेश टिळेकर यांनी सांगितले.

टिळेकर यांनी सातार्‍यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, अविनाश कदम, आप्पा कोरे, मनीष महाडवाले, गौरी गुरव, अनिता बोडस, राजू भोसले इत्यादी उपस्थित होते.

महेश टिळेकर या यात्रे संदर्भात बोलताना पुढे म्हणाले, या यात्रेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक असणार्‍या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथून सुरू झाली. वाई येथे पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेऊन आम्ही आता सातार्‍यात आलो आहोत. सातार्‍यातही आम्ही भाजपच्या निवडक पदाधिकार्‍यांशी संवाद साधत आहोत. या सन्मान यात्रेद्वारे बहुजनांचा सन्मान प्राप्त करून देणे हा मुख्य हेतू आहे. आजच्या राजकीय जीवनामध्ये जाती-जातींमध्ये भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरू आहे. मात्र महायुती सरकारने सर्वसामान्यांचा सन्मान करणे सुरू ठेवले आहे. सोनार समाजासाठी महामंडळ, इतर समाजासाठी महामंडळ तसेच ओबीसी समाजासाठी सुद्धा महामंडळाची स्थापना करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सन्मान यात्रा कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर अठरापगड जाती आणि गाव गाड्यांमध्ये महत्त्वाचा घटक असणार्‍या सर्व बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणे, हा या मागचा हेतू आहे.

विधानसभेचे  उपसभापती नरहरी झिरवळ यांनी सरकारच्या काही निर्णयाविरोधात आंदोलन केले. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. सरकारचे काही निर्णय जर त्यांना पटले नसतील तर ते या संदर्भात दाद मागू शकतात. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना त्या संदर्भात योग्य ती माहिती देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे त्यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा

संबंधित बातम्या