सातारा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहराच्या मध्यवस्तीतील चौथाई गल्ली परिसरात चोरट्यांनी अंगणवाडी सेविका स्नेहल सागर पारखी यांचे घर फोडून सुमारे 66 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, स्नेहल पारखी या शहरातील जळगाव नाक्यावरील अंगणवाडीत कार्यरत असून, त्या चौथाई गल्लीत राहतात. त्या रोज सकाळी 10.30 ते दुपारी 4 या वेळेत अंगणवाडीत जातात. या वेळेत त्यांच्या सासूबाई घरी एकट्याच असतात. स्नेहल पारखी यांनी दि. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त घरातील कपाटात आणि सुटकेस मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने बाहेर काढले होते. रक्षाबंधनानंतर दागिने पुन्हा तेथे ठेवले होते. दि. 2 ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने, त्या सोन्याचे दागिने काढायला गेल्या असता, दागिने दिसले नाहीत. त्यांनी घरात शोध घेऊनही दागिने सापडले नाहीत. त्यामुळे दि. 9 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत घरातून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली आहे. हवालदार अमोल कर्णे तपास करत आहेत.