जिल्ह्यात भक्ती आणि शक्तीचा सोमवारपासून जागर

नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये रोषणाई; धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

by Team Satara Today | published on : 21 September 2025


सातारा  : आदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळी आठ ते माध्यान्ह दुपारी चार पर्यंत घटस्थापना करण्यात येणार असून त्यानंतर देवीचा जागर करण्यात येत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील मंदिरे फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने सज्ज झाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील नवरात्र उत्सवाला वेगळी परंपरा आहे. जिल्ह्यातील औंध यमाई ,सातारा शहरातील मंगळाई देवी, मंगळवार तळ्यावरची तुळजाभवानी, शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावरील तुळजाभवानी,कास बामनोली रस्त्यावरील घाटाई देवी, कोपर्डे येथील नागाई देवी , सातारा शहरालगतच्या जानाई मळाई देवी, मांढरदेवी येथील काळुबाई, देउर येथील मुधाई देवीइत्यादी विविध मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई सह धार्मिक कार्यक्रमांसाठी ही शक्तीपीठे सज्ज झाली आहेत.

पारंपारिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यासाठी औंध व मांढरदेवी तसेच ठिकठिकाणच्या देवस्थानाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नऊ दिवसाच्या या उत्सव काळात पूजा अभिषेकासह धार्मिक कार्यक्रम भजन भोंडला श्रीसूक्त पठणासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पारंपारिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन मंदिरांसह विविध संस्था संघटनांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत महिलांचा सन्मान कन्या पूजन तसेच भोंडला या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सातारकरांची तयारी उत्साहात सुरू

सातारा शहरांमध्ये विविध नवरात्र उत्सव मंडळांनी रविवारीच देवीचे मंडपात आगमन केले आहे. सोमवारी श्रीसूक्त पठाणानंतर पारंपारिक पूजनासह देवीचा जागर करण्यात येणार आहे .भाविकांचे नऊ दिवसाचे उपवास सुरू होणार असल्याने फळ बाजारातही मोठी उलाढाल वाढली आहे .रताळी बटाटे साबुदाणे शेंगदाणे तसेच तत्सम पदार्थांना उपवासामुळे मोठी मागणी आहे सर्व पदार्थ हे 15 टक्के वाढले असून यंदाचा उपवास आणि फराळ सातारकरांसाठी महाग होण्याची चिन्हे आहेत .घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेसाठी सातारकरांची तयारी उत्साहात सुरू आहे शनिवारची सुट्टी आणि पावसाची विश्रांती असा दुहेरी योग साधून नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. पूजा साहित्य देवीसाठी महावस्त्र दागिने सजावटीचे साहित्य कन्या पूजनासाठी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरू होती .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये कपडे विक्रीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाची आत्महत्या
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला प्रारंभ

संबंधित बातम्या