सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश

by Team Satara Today | published on : 01 April 2026


​सातारा: कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​गेल्या काही काळापासून सातारा जिल्हा रुग्णालयाचा कारभार विविध कारणांमुळे चर्चेत होता. रुग्णालयातील अर्भक प्रकरण आणि मृतदेहांची झालेली अदलाबदल यांसारख्या गंभीर घटनांमुळे डॉ. करपे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. प्रशासकीय स्तरावर झालेल्या या चुकांची दखल घेत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अखेर निलंबनाचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, डॉ. करपे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याने त्यांना तातडीने पदमुक्त करण्यात आले आहे.

​निलंबन कालावधीत डॉ. करपे यांचे मुख्यालय कोल्हापूर येथील आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात निश्चित करण्यात आले आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना हे मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, निलंबन काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही; याचे उल्लंघन झाल्यास ती बाब गैरवर्तन समजून पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.

​राज्यपालांच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रमुखावरच ही कारवाई झाल्याने आता जिल्हा रुग्णालयाचा रिक्त असलेला पदभार कोणाकडे सोपविला जातो, याकडे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारुल तर्फे पाटण येथे वणव्याने आंबा, नारळ, सुपारी, बाग उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
पुढील बातमी
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ महिलांचा मृत्यू, ४ जण गंभीर

संबंधित बातम्या