सातारा : साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा नागपूर येथे आमदार सांस्कृतिक महोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आमदार प्रवीण दटके यांनी शिवकालीन किल्ले स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत उत्कृष्ट मार्गदर्शन व परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल राजेशिर्के यांचा हा सन्मान झाला.
यावेळी खासदार विकासजी महात्मे, धामणगाव आमदार प्रताप अडसळ, आ. अशोक मानकर, आ. विकास कुंभारे, आमदार रमेश मानकर,महापौर अर्चनाताई डेहनकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
छ. शिवाजी महाराज आणि गडकिल्ले हे महाराष्ट्राचे निर्विवाद शक्तीपीठ होय. आजही हेचं गडकिल्ले आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती कवटाळून तमाम भारतीयांना प्रेरणा देत आहे. याच गडकिल्यांची महती आणि इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये रुजावा आणि शिवकालीन गडकिल्ल्यांविषयी आत्मियता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून आणि दुर्गजागृती किल्ले स्पर्धा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील गडकिल्ल्यांचे परिक्षण व मार्गदर्शनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांना आमंत्रित करण्यात आले होते. राजेशिर्के यांनी दुर्ग अभ्यासाचा आणि दुर्ग भटकंतीच्या मोलाच्या अनुभवातून या स्पर्धेचे परिक्षक म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सातारा शहराचा आवाज उपराजधानी नागपूर येथे घुमल्यामुळे सातारकरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.