मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी घेण्यास नकार दिला असून, ऑगस्टमध्ये सुनावणी करणार असल्याचं सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने 5 मिनिटातच निर्णय सुनावत प्रकरण ऑगस्टमध्ये निकाली काढू असं सांगितलं आहे. तसंच आता हे अर्ज दाखल करणं बंद करा असं सांगितलं आहे अशी माहिती ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
12.30 वाजता सुनावणी सुरु झाल्यानंतर वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या सहाय्यक वकीलाने सांगितलं की, मी कपिल सिबब्ल यांच्या वतीने बाजू मांडत आहे. ते थोड्या वेळात पोहोचतील. मी थोड्या वेळात सुरुवात करतो. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 'मला हा खटला पूर्ण करायचा आहे. तुम्ही दोघेही कधी युक्तिवाद करू शकता ते सांगा' अशी विचारणा केली.
यादरम्यान, ज्येष्ठ वकील सिब्बल न्यायालयात प्रवेश करतात. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आम्ही ऑगस्टमध्ये प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही संध्याकाळी तारीख कळवू असं सांगितलं.
ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "आज सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत मोठं विधान केलं आहे. त्यांनी आता हे अर्ज दाखल करणं बंद करा असं सांगितलं आहे. हे प्रकरण 2 वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचा निकाल ऑगस्टमध्ये घेऊ. कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमधील एक तारीख द्या असं सांगितलं. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी माझं रोस्टर पाहून एक दोन दिवसांत तारीख कळवू असं सांगितलं आहे".
ऑगस्टमध्ये सुनावणी झाल्यानंतर निकाल राखीव ठेवला जाईल. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये निकाल लागू शकतो. सुप्रीम कोर्टाने आज 2 वर्षं झाली असून, आम्हाला सोक्षमोक्ष लावायचा असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.
एकनाथ शिंदेंच्या वतीने मुकुल रोहतगी आणि निरज किशन कौल कोर्टात हजर होते. तर उद्धव ठाकरेंच्या वतीने रोहित शर्मा, कपिल सिब्बल हजर होते. उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा म्हणावं लागेल. सुप्रीम कोर्टाने 2 वर्षांपासून असणारी अनिश्चितता दूर केली आहे. ऑगस्टला निकालाची अपेक्षा करु नका, तारीख मिळेल, सुनावणी सुरु होईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी निकाल यावा असा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत.