झेडपी अध्यक्षपदासाठी भाजपचा दावा - मंत्री जयकुमार गोरे, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातील

by Team Satara Today | published on : 07 March 2026


सातारा  : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर राजकीय हालचाली वेगाने सुरू असताना भाजपकडून अध्यक्षपदावर ठाम दावा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने अध्यक्षपदही भाजपकडेच असावे, अशी कार्यकर्त्यांची तसेच पक्षाची प्रामाणिक इच्छा असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. यासाठी झेडपी अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतीक महोत्वाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मंत्री गोरे म्हणाले की, सातारा जिल्हा परिषदेचा निकाल सर्वांना माहीत आहे. या निकालात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा दावा स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांची अपेक्षा देखील तशीच आहे. मात्र, या प्रक्रियेत अजून अनेक घडामोडी घडणार असून बरंच पाणी पुलाखालून जाणार आहे. तरीही अध्यक्षपद भाजपकडे यावे, यासाठी पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याशी काही राजकीय चर्चा सुरू आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री गोरे म्हणाले की, अशा प्रकारच्या राजकीय भूमिका मिडियासमोर मांडायच्या नसतात. या संदर्भातील चर्चा राजकीय स्तरावर सुरू असतात आणि त्यातूनच मार्ग काढला जातो. जर चर्चेतून काही निष्पन्न झालेच नाही, तर सर्व राजकीय पर्याय सर्वांनाच खुले असतात, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या एका बाजूला इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे इंधनाचे दर वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, अशा परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर ताण निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता भारतात इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता नाही. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार केंद्र सरकार योग्य निर्णय घेत आहे.


भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजनपूर्वक काम करत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तृणधान्य महोत्सवाने महिला उद्योजिका पुढे येतील – जिल्हाधिकारी संतोष पाटील; पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा शानदार शुभारंभ
पुढील बातमी
राज्यस्तरीय पांडुरंग सुदामे पुरस्कार पर्यवेक्षिका सौ. लीना पवार सन्मानित

संबंधित बातम्या