सातारा : विविध विषयांचे सखोल वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. प्रगल्भ समाज देशाच्या जडणघडणीला दिशा देतो. घरात श्रीमंतीच्या वस्तू नसल्या तरी चालतील, पण प्रत्येक घरात ग्रंथालय असावे. तंत्रज्ञानाच्या गर्दीत हरवलेल्या आजच्या तरुणाईच्या हातात ग्रंथ देण्यासारखे पवित्र कार्य नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक व. बा. बोधे यांनी केले.
रौप्य महोत्सवी सातारा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद मैदानावरील विठ्ठल रामजी शिंदेनगरीमध्ये प्रा. बोधे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह व संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार, उपाध्यक्ष वि. ना. लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, राजकुमार निकम, सदस्य प्रल्हाद पार्टे, सुनीता कदम, प्रमोदिनी मंडपे उपस्थित होत्या.
प्रा. बोधे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि व्यासपीठ पूजन करण्यात आले. ग्रंथ महोत्सवाचे प्रणेते शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. बोधे यांचा स्मरणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. संयोजन समितीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. बोधे म्हणाले, देशातील सर्वांत मोठा ग्रंथ महोत्सव कोलकाता येथे भरतो. तेथील नागरिक भाषिक अस्मिता जपतात आणि इतर प्रांतांमध्ये धार्मिक अस्मितेला महत्त्व दिले जाते. सातारा येथे भरणारा ग्रंथ महोत्सव हे शहराचे वैभव आहे. ग्रंथ विकत घेणारी, वाचणारी माणसे वाङमयीन पर्यावरणाला हातभार लावतात. लेखक, समीक्षक, अभ्यासक आपल्या शहराला सुसंस्कृत चेहरा मिळवून देतात. सातारा ही क्रांतिकारकांची, नाटककारांची व साहित्यिकांची भूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ही गुणसंपदा एकवटलेली आहे. या भूमीची धूळ आपण पांडुरंगाच्या अबिराप्रमाणे कपाळी लावायला हवी. आजची पिढी पुस्तके वाचत नाही, ही ओरड सातार्यात खोटी ठरली आहे. तंत्रज्ञान आणि गॅझेटच्या गुंतावळीत अडकलेल्या आजच्या पिढीला ग्रंथ व्यासंगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्या हाती ग्रंथ देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. रचनात्मक समाज घडवण्यासाठी आजच्या पिढीला ग्रंथ व्यासंगी बनवावे लागेल.
प्राचार्य डॉ. पाटणे म्हणाले, सातार्याचा ग्रंथ महोत्सव एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. या महोत्सवाने अनेक प्रकाशक, वाचक लेखक घडविले आहेत. या महोत्सवामुळे महाराष्ट्रात वाचन संस्कृती वाढत आहे, हे अभिमानस्पद आहे. सातार्याची ग्रंथ चळवळ वर्धिष्णू आहे. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रलाद पार्टे यांनी आभार मानले.