वाठार स्टेशन : वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोरेगाव तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली असून वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील नेत्यांनी या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली आहे. कुणबी उमेदवाराविरोधात वाठार स्टेशनला सर्वपक्षीय एकवटले आहेत.
याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे म्हणाले, काही नेत्यांनी राजकीय लाभासाठी कुणबी प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा आरोप केला. स्थानिक ओबीसी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमणाचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बाहेरून येऊन प्रमाणपत्रांच्या आधारे सत्ता समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाठार स्टेशन गटातील जनता कधीच स्वीकारणार नाही. भूमिपुत्रांचे हक्क हेच आमचे प्राधान्य असणार आहे.
यावेळी महेश शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी आवळे यांच्या भूमिकेला ठाम समर्थन देत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “वाठार स्टेशन गटाचे राजकारण भूमिपुत्रांचे आहे. समाजाच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या प्रमाणपत्रबाजांवर कडक भूमिका घेण्याची हीच वेळ आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अभय तावरे, रासपचे नेते भाऊसाहेब वाघ, धनाजी मोहिते, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शांताराम दोरके, मुस्लिम नेते हमीदभाई पठाण व हसनभाई शेख, माजी सैनिक गणेश चव्हाण, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल जाधव, दत्तात्रय माने, जय मल्हार क्रांती संघटनेचे किरण चव्हाण, श्रीकांत चव्हाण,माजी ग्रामपंचायत सदस्य सुमित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गुप्ता यांचा समावेश होता