वाढत्या कोंडीच्या अनुषंगाने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतूक मार्गात बदल

by Team Satara Today | published on : 10 February 2025


सातारा : सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाढत्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर हद्दीतील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते कारण या चौकात पुणे, वाढे फाटा, कोरेगाव, रहिमतपूर व कराड बाजूकडून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यानुसार दि. 11 ते 21 फेब्रुवारी दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील मार्गात खालीलप्रमाणे वाहतूक बदल करण्यात आला आहे.

 

वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आलेला मार्ग -

जिल्हा परिषद चौकाकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आल्यानंतर वाहनांना बालाजी ढाबा अथवा फर्न हॉटेल बाजूकडे म्हणजेच उजवीकडे प्रवेश करण्यास मनाई, पुणे अथवा वाढे फाटा बाजूकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सर्व्हिस रोडने येणाऱ्या सर्व वाहनांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून उजवीकडे वळण घेण्यास मनाई, कोरेगाव अथवा एमआयडीसी बाजू कडून येणाऱ्या वाहनांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून सरळ शहरात प्रवेश करता येणार नाही, कराड- अजंठा चौक- एमआयडीसी बाजू कडून सर्व्हिस रोडने येणाऱ्या सर्व वाहनांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सरळ प्रवेश करण्यास मनाई, अजंठा चौक- फर्न हॉटेल बाजू कडून कोरेगाव- कराड बाजूकडे जाणारी वाहने त्यांना बालाजी धाब्याच्या समोरील डायव्हर्शन मधून उजवीकडे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -

पोवई नाका/ जिल्हा परिषद चौक मार्गे कोरेगाव बाजूकडे जाणारी वाहने ही बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून सरळ कोरेगाव बाजूकडे जातील, तसेच बालाजी ढाबा फर्न हॉटेल बाजूकडे जाणारी वाहने डायव्हर्शनचा वापर करून अजंठा चौक बाजुकडे प्रवेश करतील, पुणे वाढे फाटा बाजूकडून येणारे सर्व वाहने बॉम्बे रेस्टॉरंट पुलाच्या पूर्व बाजूकडून येऊन बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून उजवीकडे वळण न घेता सरळ अजंठा चौक बाजुकडे जाऊन डायव्हर्शनचा वापर करून सातारा शहरात प्रवेश करतील, कोरेगाव- एमआयडीसी बाजू कडून येणारी वाहने ही बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे डावीकडे वळण घेऊन अजंठा चौक बाजुकडे जाऊन डायव्हर्शनचा वापर करून सातारा शहरात प्रवेश करतील, अजंठा चौक- कराड- एमआयडीसी बाजू कडून येणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सरळ न येता डायव्हर्शनचा वापर करून शहरात प्रवेश करतील, अजंठा चौक- फर्न हॉटेल बाजू कडून कोरेगाव- कराड बाजूकडे जाणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातूनच वळण घेऊन कराड-अजंठा चौक बाजुकडे रवाना होतील.

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात करण्यात आलेला हा बदल प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन काही सूचना असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय अथवा वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर येथे संपर्क करावा. तसेच सर्व नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांगलादेशात आयएसआय चा गेम प्लॅन
पुढील बातमी
तापोळ्यातील निकृष्ट दर्जाच्या ठेकेदारांना ‘अभय’ देणारांची चौकशी व्हावी : धोंडीबा धनावडे

संबंधित बातम्या