आज होणार फैसला - साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता?; भाजपचा वारू रोखणार का राष्ट्रवादी?

by Team Satara Today | published on : 08 February 2026


सातारा  : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी भारतीय जनता पक्षाने यंदा टोकाची लढाई उभी केली असून, साताऱ्यात ऐतिहासिक सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साताऱ्यात भाजपने आक्रमक रणनीती आखत प्रत्येक गणात ताकद लावली. प्रचारापासून मतदानापर्यंत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला, तर काही ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

मतदानानंतर जिल्ह्यात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून, “आपलाच उमेदवार विजयी” असा दावा करत अनेक ठिकाणी समर्थकांनी चक्क पैजाही लावल्याचे चित्र दिसत आहे. भाजप समर्थकांकडून जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे, तर राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत गड राखण्यासाठी चुरशीची लढत दिल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, सोमवारी दि. ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी साताऱ्याच्या राजकारणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकणार की राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला कायम राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्याच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ होणार की परंपरागत सत्ता कायम राहणार, याचा फैसला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

भाजपचा वारू रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न…

भाजपच्या आक्रमक वाटचालीला अडथळा आणण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांसह शिवसेना आणि काँग्रेसनेही आपआपल्या परीने शर्थीचे प्रयत्न केले. प्रत्येक जागेवर चुरस वाढली असून, अंतिम निकालात राजकीय गणिते कशी जुळतात याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त…

शनिवारी झालेल्या मतदानानंतर रविवारी दिवसभर जिल्ह्यातील राजकीय मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते आकडेमोडीत गुंतले होते. फोनाफोनीद्वारे विजय–पराभवाचे अंदाज बांधले जात असून संभाव्य सत्तासमीकरणांवर चर्चा रंगत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी सहकारमंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नातू अधिराज उंडाळकरांवर बिबट्याचा हल्ला
पुढील बातमी
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पहिल्या तासाभरामध्ये येणार पहिला निकाल : महामंडळाच्या गोडाऊनला पोलिसांचा बंदोबस्त

संबंधित बातम्या