मुंबई : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांवर पावसाचं सावट पाहायला मिळालं. तर, काही भागांमध्ये मंगळवारी सायंकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी पावसानं मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपलं. दरम्यान पावसाचं हे सावट अद्याप निवळलं नसून, हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागाला ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये नारिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना करण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून, वाऱ्याता सरासरी वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असून, समुद्रही खवळणार असल्यानं उसळणाऱ्या लाटा धडकी भरवू शकतात.
राज्यातील कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यानं इथं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं तळकोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम- मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फक्त कोकणच नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांसाठी पावसाचा अतिदक्षतेचा इशारा देत हवामान विभागानं नागरिकांना सावध केलं आहे. तूर्तास करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार राज्यात 22 मेपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र हा पूर्वमोसमी पाऊस कमी होणार असून, तापमानात चढ- उतार पाहायला मिळतील.
फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सध्या पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत असून अरबी समुद्र किनारी क्षेत्रासह बंगालच्या उपगरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. वाऱ्यांचा हा वेग वादळी स्थिती निर्माण करण्यात कारणीभूत ठरत आहे हे प्राथमिक निरीक्षणही हवामान विभागानं वर्तवलं आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
