सातारा : शनिवार पेठ येथील गुरुवार परज परिसरातील लजीज बिर्याणी येथील हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे का घेतोस, अशी दमबाजी करत एका टोळक्याने हॉटेल मालक आणि त्याचा पुतण्या यांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुख्तार शेर अली पालकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी दगडफेक झाल्याने दोघेजण जखमी झाल्याचेही नमूद केले आहे.
अमोल चंदू खवळे, अजय नथू गायकवाड राहणार नामदेव वाडी झोपडपट्टी, सुरज कांता दांडे राहणार मोळाचा ओढा, ओमकार राजेंद्र पवार राहणार शुक्रवार पेठ आणि अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नामदेव वाडी येथील अमोल खवळे व ओंकार पवार हे रात्री नऊच्या सुमारास चिकन 65 विकत घेण्यासाठी आले. ओंकार पवार हा फिर्यादीचा कर्मचार्याशी वाद घालू लागला. त्यावरून बाचाबाची वाढत जाऊन अमोल खवळे, ओंकार पवार यांनी फिर्यादीला दम देत तुझे हॉटेल चालू देणार नाही तुला सोडणार नाही, असा दम भरत फिर्यादी व त्याचा पुतण्या अबरार याला धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्यातील काही लोकांनी हॉटेलमध्ये येऊन तेथील फर्निचरची तोडफोड केली आणि फिर्यादीच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले.
फिर्यादी पालकर व अबरार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच दगडही मारण्यात आले. या मारहाणीत रस्त्याने जाणारा साबीर आदम शेख 636 गुरुवार पेठ हा सुद्धा जखमी झाला आहे. हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाचे पडसाद उमटताच तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यावर गर्दी केली होती. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम काळे यांच्या सूचनेप्रमाणे परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा जमल्याने पोलिसांनी संबंधितांची समजूत घालत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा तणाव निवळला. या प्रकरणी खवळे व गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.