औंध : कळंबी ता. खटाव येथील 73 वर्षीय महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले. सुधीर उर्फ सुधाकर अशोक मोहिते (रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रकाश श्रीरंग जाधव (ता. माधळमुठी, ता. खानापूर या अट्टल संशयिताचे नाव ही चोरीत निष्पन्न झाले आहे. मात्र अद्यापही तो फरार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कळंबी ते औंध रस्त्यावरून शेतातून घरी जात असताना काळया रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात अट्टल चोरटयांनी कळंबी येथील श्रीमती सिंधू बाळासो देशमुख (वय 73) यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किंमतीची बोरमाळ हिसकावून चोरुन नेली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून औंध पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश वाघमोडे यांनी पोलिस पथकासह तपासास सुरूवात केली व अवघ्या बारा तासात एकाला जेरबंद करण्यात यश मिळविले.
दोन्ही संशयित अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, विटा, इस्लामपूर, कोकरूड, आटपाडी, तासगाव या पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर घरफोडी व जबरी चोरीचे 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर घटनेचा तातडीने छडा लावल्याने सपोनि गणेश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, सतीश मयेकर, पोलीस हवालदार चेतन सानप, दादासो देवकुळे, सुनिल गोडसे, सुखदेव बुधे,नाना कांबळे, रुपाली क्षीरसागर, यशोदा मोरे, पो. कॉ. सचिन राऊत, मोहन कदम रोहित खरात ज्ञानेश्वर टिंगरे, राज शिंदे, प्रमोद इंगळे, साहिल झारी, सनी लवंगारे, राहुल जाधव, मेघा फडतरे, कोमल पवार, दिपा जाधव, सुमाली मोरे यांच्या पथकाचे वरिष्ठांनी अभिनंदन केले.