भांबवली येथे मिनी बस खड्ड्यात कोसळून तीनजण जखमी

वळणाचा अंदाज न आल्याने व ब्रेक न लागल्याने झाला अपघात

by Team Satara Today | published on : 27 May 2025


सातारा : सातारा-कास रस्त्यावर भांबवली येथे वळणाचा अंदाज न आल्याने तसेच ब्रेक न लागून मिनीबस वीस फूट खड्ड्यात कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. या अपघातामध्ये तीनजण जखमी झाले असून जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोहन गोविंद मेटकरी वय 22 राहणार इवरे, ता. आटपाडी जि. सांगली, अभिषेक चंद्रकांत चौगुले वय 21 रा. हेरवाड, ता. शिरोळ जि. सांगली, संग्राम संतोष देसाई वय 20 रा. अडकूर ता. चंदगड जि. कोल्हापूर हे तिघे जखमी झाले आहेत.

ही बस कोल्हापूर वरून आली होती. भांबवली येथील धबधबा पाहून बस मधील चौदा पर्यटक माघारी जात असताना साडेचारच्या दरम्यान भांबवली वरून कास रस्त्याला येताना ड्रायव्हरला वळणाचा अंदाज आला नाही. त्याबरोबर गाडीचा ब्रेक न लागल्याने गाडी रस्ता सोडून थेट वीस फूट खड्ड्यात खाली कोसळली. बसच्या अचानक खड्ड्यात कोसळल्यामुळे आतील प्रवासी इकडे तिकडे फेकले जाऊन जखमी झाले. यामध्ये तीनजणांना जखमा झाल्या आहेत.

बसचा आवाज येताच भांबवली फाटा येथील ग्रामस्थ व दुकानदार तसेच लगतच्या रहिवाशांनी मदत कार्य सुरू करून प्रवाशांना तात्काळ वर आणले. यानंतर जखमींना येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी गंभीर नसल्याचा निर्वाळा सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे. सातारा तालुका पोलीस या घटनेची अधिक माहिती घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पुढील बातमी
अवैधरित्या प्राण्यांची कत्तल केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या