कराड : उत्तर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण भाग आहे. याठिकाणी कृष्णा, तारळी, उरमोडी, उत्तर मांड या नद्या जातात. या नद्यांच्या प्रवाहामुळे नदी काठ्च्या गावांना व शेतकऱ्यांच्या शेतीला मोठया प्रमाणात नुकसान पोचत असते. ते टाळण्यासाठी त्याठिकाणी पुरसंरक्षक भिंती होणे गरजेचे होते. गावकऱ्यांच्या मागणीनुसार व आपण पाठपुरावा केल्यामुळे कराड उत्तरमधील सहा गावांतील पूरसंरक्षक भिंती बांधण्यासाठी १५ कोटी १३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
या पूरसंरक्षक भिंतीमुळे जमीन खचण्याचे प्रमाण थांबणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात होणार आहे. तसेच पावसाळयामध्ये नदीचे पाणी वाढले असता ते शेजारील गावांमध्ये शिरुन पूरस्थिती निर्माण होते. संरक्षक भिंतीचे काम मार्गी लागल्यामुळे पूरस्थिती उदभवणार नाही. उंब्रज (ता. कराड) येथील कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर स्मशानभूमीजवळ पूरसंरक्षक भिंत बांधणे ४.७१ कोटी, कवठे (ता. कराड) येथील कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर स्मशानभूमीजवळ पूरसंरक्षक भिंत बांधणे २.७० कोटी, मौजे कोणेगाव (ता. कराड) येथील कृष्णा नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधणे २.४६ कोटी, मौजे कालगाव (ता. कराड) येथील कृष्णा नदीच्या डाव्या तीरावर स्मशानभूमीजवळ पूरसंरक्षक भिंत बांधणे १.२१ कोटी, मौजे वराडे (ता. कराड) येथील कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर स्मशानभूमीजवळ पूरसंरक्षक भिंत बांधणे ९० लाख, मौजे कोर्टी (ता. कराड) येथील कृष्णा नदीकाठावर पूरसंरक्षक भिंत बांधणे ५५ लाख, मौजे टेंभू येथील कृष्णा नदीवर पूरसंरक्षक भिंत बांधणे २.६० कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहेत. या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.