मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक

१ कोटींची खंडणी घेताना कारवाई

by Team Satara Today | published on : 21 March 2025


सातारा : राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप झाल्याने ऐन अधिवेशनादरम्यान, खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणावरून मंत्री गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी हे जुने प्रकरण असून, या प्रकरणी कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते.

मात्र जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणामध्ये तडजोड करण्यासाठी संबंधित महिलेने ३ कोटी रुपयांची मागणी केली. तसेच यामधील एक कोटी रुपये घेताना या महिलेला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सदर महिलेवरील अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या महिलेने तीन कोटी रुपयांची मागणी केली आणि एक कोटी रुपये देण्यात आल्याचं आम्हाला कळलंय. हे जे काही नवं प्रकरण आहे त्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनाही त्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. या महिलेबाबत आज जी काही बातमी येत आहे, त्याबाबत मला फार माहिती नाही. मात्र तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे. तसेत एक कोटी हा आकडाही मोठा आहे. आता ही बातमी खरी मानली तरी एक कोटी रुपये दिले कशाला, या महिलेकडे असं काय होतं, ज्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले, एक कोटी रुपये आले कुठून, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी
पुढील बातमी
नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकर व्हाट्सअप क्रमांक : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

संबंधित बातम्या