सातारा : लोणंद-सातारा राज्य मार्गावर पिपोंडे खुर्द (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत वसना नदीच्या पुलाजवळील वळणावर झालेल्या मोटारसायकल अपघातात अक्षय दिलीप कदम (वय 37, रा. देऊर, ता. कोरेगाव) हा युवक जागीच ठार झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय कदम हे यामाहा एफझेड मोटारसायकल (एमएच-02-डीटी-1765) वरून सातार्याहून देऊर येथे गुरुवारी (दि. 4) रात्री 9 च्या सुमारास निघाले होते. पिपोंडे खुर्द गावाच्या हद्दीत वसना नदीच्या उतारावरील वळणावर अक्षय यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटारसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या घराच्या भिंतीवर धडकली.
या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन, अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. याबाबत महेंद्र कदम यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार गिरी तपास करत आहेत.