वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश; जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल

by Team Satara Today | published on : 10 November 2025


वाई : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे नेते आणि वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात रविवारी प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

ब्राह्मणशाहीतील कृष्णाबाई कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार मदन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंत यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशलि कदम, सुनील काटकर, सुरभी भोसले, अजय मांढरे, सचिन घाटगे, प्रतिभा शिंदे, रोहिदास पिसाळ, अजित वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मदन भोसले म्हणाले, शहराच्या विकासासाठी माझ्या मनात अनेक कल्पना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी अनिल सावंत हेच योग्य नेतृत्व आहे. माझ्या आणि सावंत यांच्या विचारांमध्ये एकसंधता आहे. त्यामुळेच त्यांचा भाजप प्रवेश घडून आला आहे. सावंत यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत होणार आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अनिल सावंत यांच्या रूपाने दूरदृष्टी असलेले, जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व वाईमध्ये भाजपला मिळाले आहे. केवळ गटारे, रस्ते किंवा ठेकेदारांची बिले काढणारा प्रतिनिधी नको, तर शहराच्या विस्तारानुसार नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचा दृष्टिकोन असणारा नेता हवा. वाईचा सर्वांगीण विकास, हेच आमचे ध्येय आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे बळ वाढविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. लिंब येथे आयटी पार्कमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल. वाई शहरातही रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्याचा प्रभारी म्हणून वाईची जबाबदारी माझी आहे आणि पालिकेत भाजपचा झेंडा फडकवू. सावंत यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात शहरात अनेक विकासकामे केली होती. त्यांच्या कार्यकाळात नागरी सुविधा, सुशोभिकरण आणि सामाजिक कार्यक्रमांना चालना मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झाले.

धैर्यशील कदम यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल सावंत यांच्यासह प्रवीण जाधव, संग्राम सपकाळ, प्रकाश जाधव, जमीर बागवान, गणेश पवार, संदीप पावशे, सचिन सावंत, लक्ष्मण सावंत, प्रणव सावंत, संदीप घोरपडे, मनोज निंबाळकर, केदार काटे, नीलेश वाडकर, दिगंबर सावंत, ओंकार सावंत व अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमित वाघ, सचिन पेटकर, विजय ढकाणे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. रोहिदास पिसाळ, दीपक ननावरे, काशिनाथ शेलार यांनी स्वागत केले. अमित वनारसे यांनी आभार मानले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
औंधसह २१ गावांची पाणीयोजना अडीच वर्षात करणार; ना. जयकुमार गोरे ; वरुडच्या विहंगम जलाशयाचे लोकार्पण उत्साहात
पुढील बातमी
साताऱ्यात खंडणीसह मालमत्तेचे केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या