जन्मदात्या आईचा मुलाकडून खून

पिंगळी बुद्रुक येथील घटना; मुलास अटक

by Team Satara Today | published on : 12 January 2025


सातारा : जन्मदात्या आईचा मुलाने खून केल्याची हृदयद्रावक घटना माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली आहे. घटनेतील मुलास अटक करण्यात आली आहे.

संगीता आनंदराव जाधव असे मृत आईचे नाव असून विशाल आनंदराव जाधव रा. पिंगळी बुद्रुक ता. माण, जि. सातारा असे संबंधित मुलाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, विशाल दारूच्या आहारी गेला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन घरी आला. त्यावेळी दिवसभर काम करून कंटाळलेली त्याची आई संगीता या झोपी गेल्या होत्या. घरी आल्यावर विशालने आईला जेवायला वाढण्यास सांगितले. त्यावर आईने त्याला तू रोज दारू पिऊन येतोयस, मी तुला जेवायला वाढणार नाही, हाताने घेऊन खा, असे म्हटले. याचा राग विशालला आला. दारूच्या नशेत विशालने रागाच्या भरात जवळच असलेल्या पाण्याचा हंडा उचलला व चार-पाच वेळा आईच्या डोक्यामध्ये तो जोरदार हाणला. त्यामुळे आईच्या डोक्यामध्ये रक्तप्रवाह सुरू झाला.

गंभीर जखमी झालेल्या संगीता जाधव यांना नातेवाईकांनी दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितले. सातारा येथे संगीता जाधव यांना आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दहिवडी पोलिसांनी विशाल जाधव यास अटक केली असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेला मारहाण प्रकरणी तीनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा मृत्यू

संबंधित बातम्या