भोळेवाडी येथे अंगावर वीज पडल्याने शेतकरी जागीच ठार; पत्नी किरकोळ जखमी

by Team Satara Today | published on : 04 April 2026


कराड : भोळेवाडी (ता. कराड) येथे शेतात काम करणारे 51 वर्षीय शेतकरी सतीश नाथा सूर्यवंशी हे अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाले. त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतीश सूर्यवंशी, त्यांची पत्नी उषा व भावजय हे माळ नावचे शिवारातील शेतात भांगलण करण्यासाठी गेले होते. दुपारी 2.45च्या सुमारास अवकाळी पाऊस व विजेचा कडकडाट होताच सतीश व त्यांची पत्नी उषा हे लिंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी आले. सतीश झाडाला टेकून उभे होते. काही अंतरावर पत्नी उषा झाडाखाली बसली होती. भावजय दुसऱ्या झाडाखाली बसली होती.

दरम्यान, पावसाबरोबरच विजेचा कडकडाट होऊन नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. यात सतीश सूर्यवंशी जागीच ठार झाले तर पत्नी विजेच्या धक्क्याने किरकोळ जखमी झाल्या. घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी कराड पोलिस तसेच तहसीलदार यांना दिली. सतीश सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 50 टक्केच उपयुक्त पाणीसाठा; उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता
पुढील बातमी
फलटण पंचायत समितीत कनिष्ठ लिपीक, अभियंत्याकडून तब्बल 20 लाख रुपयांचा अपहार; शासनाच्या तिजोरीवर डाका

संबंधित बातम्या