ऐन दिवाळीत भाजपा पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार

रहिमतपूर परिसरासह कोरेगाव तालुक्यात खळबळ

by Team Satara Today | published on : 20 October 2025


सातारा : कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर्स साखर कारखाना कार्यक्षेत्रात जमिनीच्या वादातून जयपूर येथील भाजपाचे पंचायतराज ग्रामविकास विभाग रहिमतपूर मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ कृष्णत निकम यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. एकसळ येथील सचिन शेलार यांनी वार केल्याचे आरोप सोमनाथ निकम यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी केला आहे. या घटनेने रहिमतपूर परिसरासह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील सोमनाथ निकम यांची शिवनेरी शुगर्स कारखाना कार्यक्षेत्र लगत शेतजमीन आहे. या जमिनीवरून कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांचे कारखाना उभारणीपासून वाद आहेत. सोमनाथ निकम यांनी आपल्या मालकीची काही जमीन कारखाना व्यवस्थापनाला वापरासाठी दिलेली आहे.

या जागेवरच कारखाना व्यवस्थापनाकडून काँक्रीट करण्याचे काम सुरू होते. रविवार, दि. १९ रोजी दुपारी याबाबतची माहिती मिळताच सोमनाथ निकम हे बंधू श्रीकांत निकम याच्याबरोबर कारखाना स्थळावर गेले. सोमनाथ निकम यांनी आमच्या परवानगीशिवाय आमच्या जमिनीत तुम्ही काँक्रिटीकरण का करताय, अशी विचारणा कारखाना व्यवस्थापनाला केली. कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांच्यात वाद झाला. 

यादरम्यानच पैलवान सचिन शेलार हे सहा-सात जणांबरोबर घटनास्थळी आले. त्यातील एकाने श्रीकांत निकम यांना धरून ठेवले तर सचिन शेलार याने सोमनाथ निकम यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले असल्याचे श्रीकांत निकम यांनी सांगितले. सोमनाथ निकम यांच्यावर रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयएनएस विक्रांत अद्वितीय : नरेंद्र मोदी
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील २०८३ शिक्षकांच्या बदल्या; दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मिळणार दिलासा

संबंधित बातम्या