फलटण : फलटण नगरपरिषद निवडणुकीत शनिवारी नगराध्यक्षपदासाठी अशोकराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जाधव यांनी प्रभाग 5 व 7 (ब) मध्येही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, सचिन गानबोटे यांनी प्रभाग 9 (ब) मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशासक निखिल जाधव यांनी दिली.
फलटण पालिका निवडणुकीत शुक्रवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, शनिवारी नगराध्यक्षपदासाठी एक आणि दोन प्रभागांमध्ेय उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी असून, नगराध्यक्षपदासाठी माजी खासदारांच्या गटाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. समशेरसिंह नाईक निंबाळकर की दिलीपसिंह भोसले हा पेच सुटत नाही, तर राजे गटाची ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी स्थिती झाली आहे. या गटाने आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे, तर तिसरी आघाडी घडायच्या आधीच बिघडत चालली आहे. इतर छोटेमोठे पक्ष राजे किंवा माजी खासदारांच्या गटाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. फलटण पालिकेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या कमी असली, तरी कर भरण्यासाठी किंवा शौचालय असल्याचा दाखला घेण्यासाठी अनेकांनी पालिकेत हजेरी लावली.
नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र सध्या आहे. या पदासाठी सात ते आठ उमेदवार असतील. गेल्या दोन दिवसांत अनेक घडामोडी घडल्या असून, प्रभाग 1, 4, 5, 12, 13 मध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत खरी लढत माजी खासदारांचा गट विरुद्ध राजे गट अशी होणार असली, तरी दोन्ही गट पक्षाचे चिन्ह घेणार की आघाडी करून लढणार, याकडे फलटणकरांचे लक्ष आहे. माजी खासदारांचा गट कमळ व घड्याळ या चिन्हावर लढेल, तर राजे गट हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता आहे किंवा गोळाबेरीज न झाल्यास छत्रीचा पर्याय आहे.