सातारा : लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव–खटाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धनगड घाटात ऊस वाहतुकीमुळे अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॅक्टर–ट्रॉलीला वेगाने येणाऱ्या मालट्रकने धडक दिल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे घाटातून उसाचे ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वाहने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर धावत आहेत. त्यातच तीव्र उतार व वळणे असल्याने हा घाट अपघातप्रवण बनला आहे. याच पार्श्वभूमीवर हादरवून सोडणारी घटना रविवारी घडली. हार्वेस्टरने तोडून आणलेला ऊस जरंडेश्वर साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर–ट्रॉलीने नेत असताना घाटाच्या शेवटच्या टोकावर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालट्रकने जोरदार धडक दिली. प्रसंगावधान राखल्यामुळे ट्रॅक्टर आणि उसाने भरलेल्या दोन ट्रॉली एका खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्या.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ पूर्ण ठप्प झाली. मात्र उपस्थित वाहनचालकांनी पुढाकार घेत मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला व काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळाले.
दरम्यान, या ठिकाणी सातत्याने वाढणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी रामोशीवाडीचे सरपंच केशवराव मदने यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस यांच्या मार्फत वर्धनगड घाट परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल व वाहतूक कोंडी टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.