सातारा : सातारा शहरातील अरुंद रस्ते हेच विकास प्रक्रियेला मारक ठरत असल्याने गेले अनेक वर्ष शहराचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी या समस्यांना सोडवण्यासाठी शहर आणि परिसरात रिंग रोड ही संकल्पना राबवल्यास साताऱ्याचा गतीने विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेण्याची मागणी सातारकरांमधून व्यक्त होत आहे.
सातारा शहरातील पोवई नाका, बसस्थानक, बॉम्बे रेस्टॉरंट, समर्थ मंदिर, मोती चौक, राजवाडा परिसरासह गोडोली नाका परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील अरुंद रस्ते हेच वाहतूक कोंडीचे मुख्य कारण असून अरुंद रस्त्यांमुळे शहर व परिसराचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरून शहराच्या पूर्व किंवा पश्चिम भागात जाण्यासाठी बहुतांश वाहनांना शहराच्या मध्यवर्ती म्हणजेच पोवईनाका, राजवाडा या परिसरातून जावे लागते. त्यामुळे राजपथावर सयाजी राजे हायस्कूल, नगरपालिका चौक, कमानी हौद, मोती चौक, समर्थ मंदिर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अरुंद रस्ते आणि अतिक्रमणे यामुळे सातारा शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला असून सातारा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड यासारखी एक संकल्पना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहर व परिसरात रिंगरोड केल्यास महामार्गावरून येणारी आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला जाणारी वाहने शहरात न येता बाहेरूनच जाण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. हा रिंग रोड झाल्यास शहराचे नाक समजले जाणाऱ्या पोवई नाक्यावरील वाहतुकीचा ताण ५० टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल.
सातारा शहरातील औद्योगिक वसाहतीसह कोरेगाव आणि रहिमतपूरकडे जाणारी मालवाहतूक करणारी जड वाहने सातारा शहराच्या हद्दीतूनच ये - जा करत असल्यामुळे या जड वाहनांची वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. त्या ठिकाणी रिंग रोड तयार केल्यास जड वाहनांना त्याचा फायदा होऊन स्वतंत्र मार्ग निर्माण होईल. ही संकल्पना प्रत्यक्षात आणल्यास शहरातील रस्ते केवळ हलक्या वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल. वाढे, कोडोली, कोडोली, खिंडवाडी, जकातवाडी या ठिकाणी रिंग रोड केल्यास ही गावे सातारा शहरातील मुख्य प्रवाहांशी जोडली जातील. त्यामुळे शहराचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होईल, नवीन गृहप्रकल्प आणि व्यापारी संकलने उभे राहतील.
अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे सातारा शहराच्या एका टोकापासून दुसरा टोकापर्यंत जाण्यासाठी ३५ ते ४० मिनिटांचा अवधी लागत आहे. परिणामी इंधनावर अधीक्षक खर्च होत आहे. रिंगरोड मुळे वेळेसह इंधन बचत होण्यासाठी मदत होईल. केवळ १० ते १५ मिनिटात शहरातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता येईल.
रिंगरोडमुळे विकास प्रक्रियेला गती येईल
रिंग रोड या संकल्पनेची प्रत्यक्ष अमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांच्या जागेला भरघोस भाव मिळण्यास मदत होईल. नवनवीन हॉटेल्स, लॉजिस्टिक पार्क, छोटे उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोल्हापूर, पुणे शहराच्या धर्तीवर साताऱ्याचाही मेट्रोसिटीकडे प्रवास होण्यास मदत होईल. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता रिंग रोड ही आता साताऱ्याची लक्झरी नसून गरज बनली आहे. रिंग रोड मुळे सातारा शहरासह परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल.
शिवेंद्रसिंहराजे तुम्ही लक्ष घालाच....
योगायोगाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह खा. उदयनराजे भोसले, शेजारील मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांनी रिंग रोडसाठी इच्छाशक्ती दाखवत पुढाकार घेतल्यास सातारा शहरासह परिसरात रिंगरोड होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे या प्रकल्पात तुम्ही लक्ष घालाच, अशी मागणी सातारा शहरातून जोर धरू लागली आहे.
पर्यटनाला गती मिळण्यास होईल मदत
सातारा शहराच्या अगदी लगत कास, सज्जनगड, ठोसेघर ही पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी जायचे झाल्यास पोवई नाका मार्गे समर्थ मंदिर येथूनच जावे लागते. हा मार्ग सुद्धा अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. विशेष करून कास पठारावरील दुर्मिळ फुले पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. त्या अरुंद रस्त्यांमुळे त्यांच्या वेळेचा खूप अपव्यव होत असल्यामुळे त्यांच्यातून मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटत असतो. रिंग रोड झाल्यास शहराच्या परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळाला गती मिळण्यास मदत होणार आहे.