गड गेला मात्र सिंह आला ; आ. अतुल भोसले यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

मनोहर शिंदे यांचा करिष्मा आणि संघटनात्मक बांधणीमुळे मलकापूर नगरपंचायत भाजपकडे

by Team Satara Today | published on : 22 December 2025


सातारा :  गड आला पण सिंह गेला अशी एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे मात्र कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव तर मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर गड गेला मात्र सिह आला.... अशा एका नवीन म्हणीचा साक्षात्कार झाला. कराडच्या पराभवामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. अतुल भोसले यांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली असून मलकापूर नगरपंचायतीमध्ये मिळालेले यश हे केवळ भाजपाचे नसून गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काँग्रेसचे तत्कालीन नेते मनोहर शिंदे यांनी केलेली विकास कामे आणि संघटनात्मक बांधणीला त्याचे श्रेय जाते त्यामुळे भविष्यात कराड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद  आणि पंचायत समिती निवडणुका या भाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत, हेच या निकालावरून स्पष्ट होते. 

कै. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी अशी ओळख असणाऱ्या कराडने विलासराव पाटील- उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते महाराष्ट्राला दिले. विलासराव पाटील- उंडाळकर यांनी सलग २५ वर्ष आमदार, एक वेळ कॅबिनेट मंत्रीपद भूषावुन महाराष्ट्राच्या राजकारणात कराडचा दबदबा निर्माण केला होता.‌ त्यांच्यानंतर कराडचे सुपुत्र म्हणून ओळख असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी सहकार मंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणात कराडची एक वेगळी छाप पाडली होती. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला. तर कराडमध्ये अतुल भोसले यांच्या रूपाने एक नवीन युवा नेतृत्व उदयाला आले. विधानसभा निवडणुकीत अतुल भोसले यांनी विजय मिळवताच भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. 

कराड नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच या निवडणुकी संदर्भात भाजपने सर्वाधिकार भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. अतुल भोसले यांना दिले. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील या मुरब्बी नेत्यांसमोर आ‌. अतुल भोसले हे एक नवखे नेतृत्व समजले जात होते. पराभव झाला तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला गट अबाधित ठेवण्यावर भर दिला तर बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून मतदार संघात पुन्हा एकदा साखर पेरणी सुरू केली होती. 

विधानसभा निवडणुकीनंतर विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कराड शहरावर आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नेते राजेंद्र सिंह यादव यांनी कराडमध्ये बेरजेचे राजकारण सुरू करत भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले. गेले अनेक वर्ष कराडच्या राजकारणात सक्रिय राहणाऱ्या राजेंद्र सिंह यादव यांनी आपल्या भूमिकांशी कोणतीही फारकत न घेता सर्वच पक्षातील नेत्यांनी समवेत मैत्रीपूर्व संबंध जोपासले. अशातच राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अनेक राजकीय स्थितातरे झाली. गेली अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उजवा हात समजल्या जाणार्‍या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाशी हात मिळवणी केली. याचे संपूर्ण श्रेय भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. अतुल भोसले यांना दिले गेले. आ. अतुल भोसले यांनी मनोहर शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा करून त्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यात यश मिळवले. 

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारणात चाणक्य समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता पारंपारिक आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या निवडणुकीला भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट एकत्रितरित्या सामोरे जातील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. भाजप श्रेष्ठींनी कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आ. अतुल भोसले यांना दिले. कराड नगरपालिकेसाठी जागा वाटपाचा खल सुरू असताना मतभेद झाल्यामुळे त्या ठिकाणी भाजपने एकनाथ शिंदे शिवसेना गटाशी हात मिळवणी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजिबात वेळ न घालवता राजेंद्रसिंह यादव यांनी बाळासाहेब पाटील यांच्या आघाडीशी युती करत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. राजेंद्रसिंह यादव यांच्या या निर्णयाच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठामपणे उभा राहिले. 

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे बाळासाहेब पाटील, राजेंद्रसिंह यादव तर दुसरीकडे राजकारणात नवखे असणारे आ. अतुल भोसले असे चित्र पाहायला मिळाले. या निवडणुकीत अतुल भोसले यांच्या पाठीमागे संपूर्ण पक्षाची ताकद खंबीरपणे उभी होती. आ. अतुल भोसले यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जातीने सभेसाठी हजर होते. दुसरीकडे बाळासाहेब पाटील, राजेंद्रसिंह यादव यांनी प्रचारासाठी कोणत्याही नेत्याला पाचारण न करता पायाला भिंगरी लावून कराडच्या विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत प्रचार केला. त्याचे फळ या दोन्ही नेत्यांना मिळाले. या निवडणुकीत कराडच्या जनतेने यशवंत- लोकशाही आघाडीवर शिक्कामोर्तब केले. राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंत विकास आघाडीला नगराध्यक्ष पदासह ८ तर लोकशाही आघाडीला १३ जागांवर विजय मिळाला. हा संपूर्ण निकाल केवळ आ. अतुल भोसले यांनाच नव्हे तर भाजपालाही आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 

मलकापूर, ता. कराड नगरपालिका निवडणूकीत भाजपा ने २२ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला असला तरी हा संपूर्ण विजय भाजपाचा आहे असे म्हणता येणार नाही. मलकापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मलकापूरमध्ये प्रचंड विकास कामे केली. त्यामुळे मलकापूर नगरपालिका निवडणुकीत इनकमिंग राजकारण, मनोहर शिंदे यांचा करिष्मा आणि त्यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे भाजपला विजय सोपा गेला.

राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. कराड नगरपालिका भाजपच्या हातून गेली तरी कराड पंचायत समितीवर वर्चस्व मिळवणे हे भाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. नुकताच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील बाळासाहेब पाटील, राजेंद्रसिंह यादव यांची युती पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड उदयसिंह पाटील- उंडाळकर हेही पूर्ण ताकतीने उतरतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आ. अतुल भोसले यांनी नगरपालिका निवडणूक भाजपचा झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करून पुन्हा एकदा भाजपाच्या संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखेर कराडकरांनी दाखवून दिलेच..!‌
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करा

संबंधित बातम्या