सातारा जिल्ह्याने इतिहासात पहिल्यांदाच हा प्रसंग पाहिला - पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उद्विग्न प्रतिक्रिया; त्यांनी जे केले त्याची परतफेड करू- मंत्री मकरंद पाटील

by Team Satara Today | published on : 04 April 2026


सातारा :  सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असून जिल्हा परिषदेचे सदस्य काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसले हा प्रसंग अगदी जिल्हा लोकल बोर्डापासून, जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासूनच्या इतिहासात सातारा जिल्ह्याने पहिल्यांदाच पाहिला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने आजही सभापती पदे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, ॲड. उदयसिंह पाटील, बाळासाहेब सोळसकर, सुरेंद्र गुदगे, अनिल देसाई, संदीप मांडवे आदी उपस्थित होते. त्

भाजपने जे राजकारण केले त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य सभागृहात आवाज उठवतील. आमच्या एका जरी सदस्यावर काही अन्याय झाला तरी सर्वजण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील तसेच देसाई यांनी सांगितले.

भाजपने जे केले, त्याची परतफेड करू !

आम्ही काल राजकारणात आलो नाही. पन्नास वर्षांपासून राजकारणात आहोत. त्यांनी सुरुवात केली आहे. आम्ही त्याचा शेवट करू. त्यांनी जे केले त्याची परतफेड करू,  असा खणखणीत इशारा मंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी भाजपला दिला.

या जिल्ह्याच्या मातीमध्ये आमचा जन्म झाला असून या मातीचे संस्कार आमच्यावर झाले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे राजकारण आम्ही चालू देणार नाही असा इशाराही यांनी यावेळी दिला. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. प्रचंड बळाचा, पैशाचा आणि प्रशासनाचा वापर करून हा प्रयोग त्यांनी सुरू केला आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत असेही ते म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात राष्ट्रवादी - शिवसेना गट युतीला पुन्हा एकदा धक्का; भाजपने विषय समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध केल्या; दोन फुटीरांना सभापतीपदाची लॉटरी
पुढील बातमी
शिवसेना व राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्पष्टोक्ती

संबंधित बातम्या