छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांना मोठे यश

by Team Satara Today | published on : 21 January 2025


छत्तीसगड : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रविरोधी नक्षलवादी मोहिमेचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये गेल्या ३६ तासांपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण १४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. 

काल सकाळपासून कुल्हाडीघाटच्या भालुदिघी टेकड्यांवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काल झालेल्या चकमकीनंतर करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले, त्यापैकी एक महिला आहे. तर आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांना १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळावरून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

सध्या उडालेल्या या चकमकीत नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे. या चकमकीत मोठे कॅडरचे नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ओडिशा राज्य नक्षलवादी प्रमुख जयराम उर्फ ​​चलपती याचा सुद्धा सुरक्षा दलाने खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे. चलपती याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच, या चकमकीत सीसीएम मनोज आणि गुड्डू यांच्या सुद्धा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या चकमकीत एक सुरक्षा जवान सुद्धा जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जवानाला उपचारांसाठी विमानाने रायपूरला नेण्यात आले. ओडिशा आणि छत्तीसगड सुरक्षा दलांच्या या संयुक्त कारवाईत जवळपास १ हजार जवानांनी दोन्ही राज्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांना घेरले होते. सुरक्षा दलांची एकूण १० पथके नक्षलवाद्यांवर संयुक्त कारवाई करत आहेत. शोधमोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांचे आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. तसेच, ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक
पुढील बातमी
गुलेन बॅरी सिंड्रोम कितपत चिंताजनक?

संबंधित बातम्या