स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मेघदूतवर ठरली रणनीती; ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा रणनाद

by Team Satara Today | published on : 11 November 2025


मुंबई :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आता स्पष्ट आणि ठोस तयारीला सुरुवात झाली आहे. पर्यटन मंत्री आणि महायुती समन्वय समितीचे प्रमुख सदस्य ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली मेघदूत शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महायुतीच्या एकत्रित लढाईसंदर्भात सखोल धोरणात्मक चर्चा झाली.

या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भाजप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

राज्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा करताना ना. शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा महायुतीने एकजुटीने लढण्याची गरज अधोरेखित केली. काही ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढणे शक्य नसल्यास, परस्परांमध्ये कटुता न आणता संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून परिस्थिती हाताळावी, अशी संयमी पण ठाम भूमिका त्यांनी मांडली. संघटनात्मक तयारी, प्रचारयंत्रणा बळकट करणे, तसेच स्थानिक पातळीवर मतदारांशी थेट संवाद साधणे या मुद्द्यांवर सविस्तर मंथन झाले. महायुतीच्या कार्यपद्धतीत संवाद, समन्वय आणि संयम हे तीन आधारस्तंभ राहणार असल्याचे ठरले.

राज्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही बैठक महायुतीसाठी दिशादर्शक ठरल्याचे मानले जात आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या तयारीला या चर्चेतून नवी गती मिळाली असून, पुढील काही दिवसांत जिल्हानिहाय पातळीवर अशाच रणनीती बैठका घेण्यात येणार आहेत. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा “महायुती विरुद्ध इतर” अशी लढाई रंगण्याची चिन्हे या बैठकीतून स्पष्ट झाली आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपहरण व मारहाणप्रकरणी मनसेच्या तालुकाध्यक्षांसह तिघांना अटक; शिरवळ पोलिसांची कामगिरी; तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकवून मागितली खंडणी
पुढील बातमी
सदरबाजारमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

संबंधित बातम्या