सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. इलेक्ट्रिक दुचाकीवरील २८ वर्षीय सारिका सुतार (रा. संगममाहुली, सातारा) या महिलेचा ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बे रेस्टॉरंटहून अजंठा चौकाच्या दिशेने दोन महिला दुचाकीवरून जात होत्या. त्याचवेळी अजंठा चौकातून ऊसाने भरलेली ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्टर या मार्गावर आला. टीव्हीएस शोरूमसमोर सर्व्हिस रोडवर येण्यासाठी एक क्रेटा कार अचानक पुढे आली. क्रेटा कारला चुकवताना ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर उजवीकडे वळवला.याच क्षणी समोरून येणारी दुचाकी समोरील मोठ्या खड्ड्यात आदळली. धक्का बसल्याने मागे बसलेल्या सारिका सुतार खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडाला . सारिका सुतार या अजंठा चौकातील खासगी वर्गात शिकवण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शफीक पठाण यांच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अनेक वाहने महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूने बेकायदेशीरपणे पार्क केली जातात. त्यामुळे रस्ता अत्यंत अरुंद होऊन वाहनांना वळण घेणे कठीण जाते. अनेकदा या वाहनांमुळे अपघाताचे प्रसंग उद्भवले आहेत.वाहतूक पोलिसांनी पार्किंग हटवण्याची सूचना दिल्यावर पठाण यांनी वाहतूक पोलीस राजगे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घातल्याची माहितीही पुढे आली आहे.
सेवा रस्त्यांवर वाढला अपघातांचा धोका
रस्त्यावरील खड्डे, रिक्षांचा अनधिकृत थांबा आणि महामार्गावर उतारावर थांबणारी खासगी वाहने यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.या परिसरात मोठमोठे खड्डे, सर्व्हिस रोडवरील अनियमित पार्किंग, रस्त्याच्या कडेला अनधिकृत रिक्षा स्टॅंड आणि महामार्गावर खासगी वाहनांचे उतारावर थांबणे यामुळे दिवसभर वाहतुकीचा गोंधळ निर्माण होतो.
जागोजागी खड्डेच खड्डे
अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान अपघात झालेल्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाने उघडीप देऊन आता तीन महिने उलटून गेले असतानाही या सेवा रस्त्यावरील एकही खड्डा न बुजवल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. आणखी कोणाचा तरी बळी जाण्यापूर्वी या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
काही दिवसांपूर्वीच केली होती अपघाताची भीती व्यक्त
पुणे येथील नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर हॉटेल फर्नसमोर खाजगी वाहन चालक प्रवासी घेण्यासाठी अचानक थांबत असतात. त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होण्याची भीती 'सातारा टुडे' मधून व्यक्त करण्यात आली होती. या भीतीकडे राष्ट्रीय प्राधिकरण, महामार्ग पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानंतर काही दिवसातच आज त्याच परिसरात झालेल्या अपघातात युवतीचा बळी गेल्यामुळे आता तरी संबंधित प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे.