सातारा : राजकीय उदासीनता, पालिका प्रशासनासह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाची हतबलता त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात ठिकठिकाणी उभी राहिलेली अतिक्रमणे हीच साताऱ्याची मूळ समस्या असून पेन्शनर सिटी नव्हे तर अतिक्रमणांचे झंजाळ अशी सातारची नवीन ओळख होत असून सातारचे नवनिर्वाचित प्रथम नागरिक, नगराध्यक्ष अमोल मोहिते अतिक्रमणे करण्यासाठी पुढाकार घेणार का? असा सवाल सुज्ञ सातारकरांमधून व्यक्त होत आहे.
सातारा बसस्थानक, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप चौक, मोळाचा ओढा आणि वाढे फाटा या सहा ठिकाणांवरून सातारा शहरात शिवतीर्थ म्हणजेच पोवई नाका येथून राजपथ, मधील रस्ता म्हणजेच ( जय विजय टॉकीज मार्गे) , खालील रस्ता म्हणजे ( बुधवार नाक्या मार्गे) शहरात जाण्यासाठी तीन मुख्य रस्ते आहेत. यातील मुख्य मार्ग राजपथ हा समजला जातो. पोवई नाका येथील मरीआई कॉम्प्लेक्स पासून राजवाडापर्यंत विविध प्रकारच्या अतिक्रमणांनी रस्त्याच्या दुतर्फाला अक्षरशः गिळून टाकले आहे. राजपथ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पायी चालत जाण्या येणाऱ्यांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून फूटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर दुकानांचे बोर्ड, काही ठिकाणी तर चक्क दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवण्यात येत असल्यामुळे पायी चालत जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना फूटपाथचा कोणताही उपयोग होत असताना दिसत नाही. सिटी पोस्ट ते राजवाडा परिसरातील फूटपाथ विविध कापड विक्रेते, भाजी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी अक्षरशः गिळून टाकले आहेत. राजवाडा परिसरात बस स्थानकासमोर विविध फळक्रेत्यांनी रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात हातगाडे लावत अतिक्रमण केल्यामुळे या परिसरातून वाहने चालवायची कशी? असा फार मोठा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
बसस्थानक परिसरात फुटपाथवरच वडापाव, भजी, चहा
विक्रेत्यांचे गाडे, विविध पान टपऱ्या, बूट- चप्पल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडले आहे. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. काँग्रेस भवन परिसरालाही अतिक्रमणांचा फार मोठा विळखा पडला असून त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सर्रासपणे चप्पल बूट, फळांचे गाडे, पट्टे, गॉगल, पॉकेट विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे अनधिकृतपणे आपली दुकाने लावून ठेवली असल्यामुळे या परिसरात गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. राधिका चौक ते राजवाडा म्हणजेच खालील मार्ग हा सुद्धा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला असून रस्त्याच्या कडेलाच रसवंती गृह, पान टपऱ्या, चहा, वडापावचे गाडे, दुकानांच्या नावांचे बोर्ड रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असल्यामुळे या अतिक्रमांचा वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे.
पोवई नाका ते राजवाडा म्हणजेच जयविजय टॉकीज मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर तर अतिक्रमणांची बजबजपुरी माजली आहे. हॉटेल भारत भुवन परिसरात कुलूप, चपला, बूट दुरुस्त करणारे व्यावसायिक, पाणीपुरी, भेळ, फळ विक्रेत्यांचे गाडे अगदी बिनधास्त रस्त्याच्या कडेला लावण्यात येत असल्यामुळे दुचाकी पार्किंग करायची कोठे? हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेशेजारी असणाऱ्या चर्च परिसरही या अतिक्रमणांच्या विळख्यातून सुटू शकला नाही. शेटे चौक परिसरात कोंबडे विक्रेते, पान टपरी चालकांनी त्या परिसराला अक्षरशः गिळून टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुढे जुना मोठा स्टॅन्ड येथे राजवाड्याकडे जाणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला असला तरी मोती चौक ते जुना मोठा स्टॅन्ड या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा फार मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी ठाण मांडले असल्यामुळे दुचाकी वाहने पार्किंग करण्यावर फार मोठ्या प्रमाणावर मर्यादा पडत आहेत.
सातारा - सोलापूर महामार्गावर म्हणजेच बांधकाम भवन ते बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा फुटपाथ उभारण्यात आले आहेत. मात्र त्या ठिकाणी मोबाईलचे सुट्टे भाग विक्री करणारे विक्रेते, चादर, रग, गरम कपडे विक्री करणाऱ्या दुकान चालक, शूज, सॅंडल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह पाणीपुरी, भेळ विकणाऱ्या गाडे चालकांनी फूटपाथ अक्षरशः गळंकृत केला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम भवन, सातारा जिल्हा परिषदेची मुख्य इमारत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान असताना हा परिसर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असल्यामुळे फुटपाथ नेमके कोणासाठी बांधले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अतिक्रमणे काढण्यासंदर्भात राजकीय उदासीनता फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून पालिका प्रशासन, वाहतूक शाखेचे दुर्लक्ष यामुळे साताऱ्याला पेन्शनवर सिटी नव्हे तर अतिक्रमणांचे झंझाळ असेच दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
मोहिते अतिक्रमणांवर हातोडा मारणार का?
साताऱ्यात गेली सहा वर्ष तब्बल प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे सातारकरांच्या समस्यांवर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना बोलता येत नव्हते. आता प्रशासकीय राजवट संपली असून उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मनोमिलन ही अभ्यद्य राहिले आहे. त्यामुळे आता नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवकांनी धडाडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असून साताऱ्यात निर्माण झालेल्या अतिक्रमणांच्या झंजाळावर लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते हातोडा मारणार का? याकडे सातारकर यांचे लक्ष लागून राहिले आहे.