सातारा : तापोळा, ता.महाबळेश्वर तालुक्यात सोनाट गावातील शेतकरी राघू जानू कदम (वय ५५) यांचा आज सकाळी रानगव्याच्या भीषण हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे सकाळी नेहमीप्रमाणे शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी गावातील काही शेतकरी पिकांची पाहणीसाठी गेले असता, त्यांना कदम शेतात पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता रानगव्याने केलेल्या प्रचंड हल्ल्यामुळे त्यांच्या छातीला खोलवर जखम झाली होती. गव्याच्या शिंगाने छाती फाटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
गेल्या काही महिन्यांत या परिसरात रानगवे, रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत असून अनेकांनी शेती करणेच बंद केले आहे. आजच्या या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.