सशाची शिकार करणाऱ्यांना ढवळ येथील चार जणांना वनकोठडी ; रंगेहाथ पकडले, फलटण वनविभागाची कारवाई

by Team Satara Today | published on : 03 November 2025


फलटण  : ढवळ (ता. फलटण) येथे वनविभागाने राबवलेल्या रात्रगस्तीदरम्यान बेकायदेशीर ससा शिकार प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. या प्रकरणात चार जणांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वनविभागाने दिलेली अधिक माहिती अशी, दि. २ नोव्हेंबररोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजता, वनपरिक्षेत्र फलटण अंतर्गत  ढवळ येथील राखीव वनकक्ष क्रमांक ८0७ मध्ये वनअधिकारी रात्रगस्ती करत असताना चार जण ससा या वन्यप्राण्याची शिकार करताना आढळले. वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून त्यांना रंगेहात पकडत गुन्हा नोंदवला. 

यामध्ये अकट करण्यात आलेली आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : सुनिल कचरू बरडे, (रा. इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे(,  विजय सुनिल बरडे, (रा. इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे(,  कैलास सुनिल गोलवड, (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर९,  राजू कैलास गोलवड, (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी आहेत. त्यांच्याकडून सहा वाघरी, एक लोखंडी कोयता, एक लगोर आणि एक बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी एक दिवसांची वनकोठडी सुनावली.

ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री. दिगंबर जाधव (रोहयो व वन्यजीव), सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर (फलटण), वनपाल नितिन जगदाळे, वनरक्षक  सुरज इनकर तसेच फलटण वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांच्या पथकाने केली. याबाबतचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नगर विकास आघाडीची आज साताऱ्यात बैठक; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जाणून घेणार कार्यकर्त्यांची मनोगते
पुढील बातमी
जुने नवे काही नाही, आपण सर्वजण एक आहोत; एकदिलाने काम करून निवडणुका जिंकण्याचे शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन

संबंधित बातम्या