मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा आणि विभागीय पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण, जि. सातारा येथे दि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळावे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या महोत्सवात नागरिक, शेतकरी, पर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमांचा समावेश आहे. २ एप्रिलला शाहिरी पोवाडा कार्यक्रम, ३ एप्रिलला भजनी मंडळ कार्यक्रम, ४ एप्रिलला ब्रास बँड पथकाचा थरार व ५ एप्रिलला लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांबरोबरच आनंदमेळा, बोटींग, घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग, उंट सफारी पर्यटकांना अनुभवता येणार आहे. आनंदमेळा, शस्त्र प्रदर्शन, इलेक्ट्रीक बग्गी, कार्निवल परेड, कृषी प्रदर्शन, खाद्यजत्रा, पशु-पक्षी प्रदर्शन सदर महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. त्याचबरोबरीने महोत्सवामध्ये महिला बचत गटांना दालन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’मध्ये मनोरंजन विश्वातील कलाकार उपस्थित राहणार आहेत. संस्कृती बालगुडे, जान्हवी किल्लेकर, स्पृहा जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, गायक अभिजीत जाधव-आमु जाधव आदी कलाकार महोत्सवामध्ये सहभागी होतील.
यासोबतच योग, ध्यान आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आरोग्य पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल, तर पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, जेटस्की जलक्रीडा, ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंग आणि सीप्लॅन राईड यांसारख्या साहसी उपक्रमांमुळे पर्यटकांना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. डोंगरी पर्यटन महोत्सवादरम्यान पर्यटकांना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाची विविध रूपे अनुभवता येणार आहेत. महोत्सवात स्थानिक लोककला, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचे विशेष सादरीकरण आयोजित केले जाणार आहे. तसेच पर्यटकांना ग्रामीण जीवनशैलीचा जवळून परिचय करून देण्यासाठी कृषी पर्यटनाशी संबंधित उपक्रम राबविले जातील.
राज्याच्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने स्थानिक महिला सशक्तीकरण, युवा पर्यटन आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जातील. सह्याद्रीतील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या वारशाचा परिचय करून देणाऱ्या विशेष पर्यटन सहली तसेच परिसरातील प्रेक्षणीय स्थळे आणि प्राचीन मंदिरांच्या भेटींचे आयोजनही करण्यात येणार आहे.
स्थानिक महिला बचत गटांच्या हस्तकला आणि कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री, तसेच सातारा जिल्ह्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारे पाककृती प्रदर्शन हेही महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. याशिवाय बोटींग शर्यत, छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा तसेच विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून पर्यटन क्षेत्रातील भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यासाठी विशेष परिचय सहल (Fam Tour) देखील आयोजित केली जाणार आहे.
श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.) प्रधान सचिव (पर्यटन), महाराष्ट्र शासन
“राज्याच्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने ग्रामीण, साहसी आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’या उपक्रमामुळे स्थानिक कौशल्य, संस्कृती आणि पर्यटन संधी यांचा प्रभावी संगम साधला जाईल.”
श्री. डॉ. बी. एन. पाटील (भा.प्र.से.), संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य
“कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना साहसी उपक्रमांसह स्थानिक संस्कृती, पाककला आणि नैसर्गिक सौंदर्याचा बहुआयामी अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवामुळे पाटण आणि सातारा जिल्ह्याची पर्यटन ओळख अधिक दृढ होईल.”