सातारा : तब्बल नऊ वर्षांच्या दीर्घ खंडानंतर सातारच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा तोच जोश आणि तोच जल्लोष पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजवले असून, येत्या ५ फेब्रुवारीला मतदानाचा महासंग्राम पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठी हा 'काटे की टक्कर' होणार असल्याने जिल्ह्यातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
जिल्हा परिषदेची मुदत संपून जवळपास पावणेचार वर्षे उलटून गेली होती. प्रशासक राजवटीमुळे विकासाच्या गप्पा आणि राजकारणाचे फड थंडावले होते. मात्र, आता निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात साताऱ्याचा समावेश केल्याने १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऐन थंडीत जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळणे बंधनकारक होते. सातारा जिल्हा परिषदेत आरक्षणाची टक्केवारी ३८.४६ टक्के असल्याने, म्हणजेच ५० टक्क्यांच्या आत असल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड असले तरी, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार की स्थानिक पातळीवर वेगळ्या आघाड्या होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढा देणार का, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पुढील तीन आठवडे 'हाई व्होल्टेज' ड्रामा
१६ जानेवारीला अर्ज भरण्यास सुरुवात आणि ५ फेब्रुवारीला मतदान, असा हा वेगवान कार्यक्रम आहे. त्यामुळे तयारीसाठी वेळ कमी आणि स्पर्धा जास्त, अशी स्थिती असल्याने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जागांसाठी खालीलप्रमाणे लढत होईल:
खुला प्रवर्ग (Open): ४० जागा (सर्वात मोठा वाटा)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): १७ जागा
अनुसूचित जाती (SC): ०७ जागा
अनुसूचित जमाती (ST): ०१ जागा
पंचायत समिती १३० गण
खुला प्रवर्ग: ८७ जागा
ओबीसी: ३० जागा
अनुसूचित जाती: १३ जागा
अनुसूचित जमाती: ०० (एकही जागा नाही)
तालुकानिहाय गट अन् गण संख्या
महाबळेश्वर - ०२ - ०४
वाई - ०४ - ०८
खंडाळा - ०३ - ०६
फलटण - ०८ - १६
माण - ०५ - १०
खटाव - ०७ - १४
कोरेगाव - ०६ - १२
सातारा - ०८ - १६
जावळी - ०३ - ०६
पाटण - ०७ - १४
कराड - १२ - २४