पुणे : मरगळलेल्या साहित्यविश्वाला उत्साह देण्याचे कार्य सातारा येथे आयोजित केलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून झाले आहे. मांडवापासून दूर गेलेल्या साहित्यरसिकांना साहित्याच्या मांडवाखाली आणण्यात या संमेलनाच्या माध्यमातून यश मिळाले आहे. नेमक्या व नेटक्या संयोजन व आयोजनासाठी हे संमेलन गाजले, याचा आनंद आहे. हे शिवधनुष्य विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या लिलया पेलले. साहित्य क्षेत्राला तरूण नेतृत्वाची, सामर्थ्याची गरज आहे, ही जाणीव या संमेलनाच्या यशस्वीतेतून झाली, असे गौरवोद्गार अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.
सातारा येथे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व आणि अत्युत्तम रितीने आयोजित करणारे संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा आडकर फौंडेशनतर्फे आज (दि. १३) माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांची विशेष उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सातारा येथील शतकपूर्व संमेलन अभूतपूर्व करण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात येत होते. नियोजनात अचूकता, धिरोदत्तता आणि समन्वय यावर भर देण्यात आला. नकारात्मक शक्तींना नामोहरम करण्यासाठी सातत्याने जागरूक राहिलो. जीभेवर खडीसाखर, बोलण्याज जाई-जुईची फुले आणि डोक्यावर बर्फ ठेवून स्थितप्रज्ञता आणि चतुराईने काम केल्यामुळे हे संमेलन प्रत्येकाला आपलेसे वाटले. ९९वे संमेलन हे सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचेच झाले. स्थितीस्थापकत्व प्राप्त न केल्याने तसेच गुणवत्तेतही तडतोड न केल्याने विविध विचारधारांचे लोक एकत्र आणत वेगवेगळ्या विचारप्रवाहांना सहभागी करू शकलो हे मोठे संचित होय.
सोन्यासारखे विचार देणाऱ्या साहित्यिकांना चांदीच्या ताटात भोजन..
सत्काराला उत्तर देताना विनोद कुलकर्णी म्हणाले, प्रा. मिलिंद जोशी यांची धडाडीची भूमिका, सुनिताराजे पवार यांची आश्वासक कृती यामुळे सातारा येथील संमेलन आदर्श ठरले. विक्रमांचे संमेलन करण्याचे पाहिलेले स्वप्न या यशामुळे साकार झाले. या संमेलनाच्या यशस्वीतेमागे हजारो हातांचे सहकार्य लाभले. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शन, भरभक्कम साथ लाभल्याने हे संमेलन राजाच्या गावातील संमेलन म्हणून दीर्घकाळ लक्षात राहील. संमेलनात चांदीच्या ताटात भोजन हा देखावा कशासाठी या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, सोन्यासारखे विचार सांगणाऱ्या साहित्यिकांना चांदीच्या ताटात भोजन देण्याची इच्छा होती ती पूर्ण करता आली याचे मोठे समाधान आहे. चांगले काम केल्यानंतरही चुका, उणीवा काढणारे अनेकजण असतात; परंतु आडकर फौंडेशनतर्फे झालेला कृतज्ञता सत्कार ही केलेल्या कामाची पावती ठरली.
कार्यपद्धती, मार्गदर्शकप्रणालीची कार्यपुस्तिका तयार करावी : चंद्रकांत दळवी
च्रदकांत दळवी म्हणाले, विनोद कुलकर्णी यांच्या रूपाने साहित्यक्षेत्रासाठी उत्तम नेतृत्व मिळाले आहे. आदर्शवत ठरलेल्या या संमेलनाच्या कार्यपद्धतीची, मार्गदर्शकप्रणालीची कार्यपुस्तिका तयार करणे आवश्यक आहे. उत्तम नियोजन, समन्वय याचा आदर्श वस्तुपाठ या संमेलनातून समोर आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी विनोद कुलकर्णी यांनी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले कार्य देखील आदर्शवत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार, लेखक-वाचक जोडण्याचे कार्य घडले आहे. स्वागताध्यक्षांसह प्रत्येक पदाधिकाऱ्याची संमेलनस्थळी अखंडित उपस्थिती, प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्यासाठी केलेले परिश्रम, शैक्षणिक संस्थांचे सहकार्य या संमेलनाच्या यशस्वीततेसाठी फलदायी ठरले आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी सत्काराच्या आयोजनामागील भूमिका मांडताना विनोद कुलकर्णी यांची समयसूचकता, उत्तम सहकाऱ्यांची निवड, अचूकता तसेच प्रा. मिलिंद जोशी व सुनिताराजे पवार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने हे संमेलन यशस्वी झाल्याचे सांगितले. तसेच संमेलनाच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन करत उत्तम मार्गदर्शन, आखीव-रेखीव मांडणी, वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक उपक्रम, सातारकरांचे सुखद सहकार्य यांचे कौतुक केले.