सातारा : सातारा परिसरातील बांधकामावरुन सेट्रिंगच्या प्लेटा चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) शिवतेज गणेश साळुंखे (वय 21, रा. कारंडवाडी ता. जि. सातारा) याला अटक केली. त्याचे दोन साथीदार पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयिताकडून 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास सातारा शहरामधील विलासपूर येथून बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाहून चोरट्यांनी सेट्रींगच्या 25 प्लेटा चोरी केलेल्या होत्या. त्याबाबत सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस याचा तपास करत असताना त्यांना चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयिताकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली देवून अन्य दोन साथीदारासोबत संबंधित प्लेटा दुचाकीवरुन वेळोवेळी चोरी करून नेल्याचे सांगितले. चोरीच्या प्लेटा एका शेडमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून त्या प्लेटा जप्त केल्या. गुन्ह्यातील चोरलेल्या 25 प्लेटा मिळून आल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस अन्य दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.
या कारवाईत वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलीस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.