सातारा : तडीपारीचे आदेश असतानाही सातार्यात खुलेआम फिरुन एकाला दारुसाठी पैसे मागून जबरी चोरी करत वाहनाची तोडफोड केली. तडीपारीतील गुंडासह टोळक्याने राडा केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, सदरबझार, सातारा), हर्षद शेख, संदीप नाईक, अनोळखी एक या चौघांविरुध्द विजय जालिंदर जाधव (वय 30, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. यातील सुश्रीत सावंत हा तडीपार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 23 मार्च रोजी शनिवार पेठेतील सार्वजनिक शौचालय परिसरात घडली आहे. तक्रारदार विजय जाधव हे रस्त्याने जात असताना त्यांना संशयितांनी अडवले. संशयितांनी दारु पिण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. यावर तक्रारदार यांनी पैसे नसल्याचे सांगताच संशयितांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांनी तक्रारदार यांचा मोबाईल, 1 लाख 40 हजार रुपयांची सोन्याची चेन व रोख 2 हजार रुपये असा मुद्देमाल जबदरस्तीने चोरुन घेतला. तसेच संशयितांनी दुचाकी दगडाने फोडून त्याचे नुकसान केले. या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्यास सुरुवात केली. सुश्रीत सावंत याच्यावर तडीपारीची कारवाई असल्याचे समोर आले. पोलीस सदरबझार येथे गेले असता तो दि. 23 मार्च रोजी सदरबझार येथे सापला. त्यावरुन तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी स्वत: दाखल केला.