वेणेगाव : कामेरी (ता. सातारा) गावचे सुपूत्र शौर्य चक्र विजेते रिटायर्ड सुभेदार मेजर शिवाजी कृष्णा घाडगे यांच्या शौर्याला भारतीय रेल्वेने उजाळा दिला आहे. भारतीय रेल्वेच्या डब्ल्यू ए.जी-9 एच सी या (लोको) रेल्वे इंजिनला त्यांचे नाव दिले असून ही गोष्ट कामेरी गावासाठीच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
सुभेदार मेजर शिवाजी घाडगे यांच्या सैन्य दलातील पराक्रमाचा कामेरी गावाला सार्थ अभिमान आहे. जम्मू कश्मीरमधील किश्तवाड येथे सुभेदार मेजर शिवाजी घाडगे यांनी 17 मे 2001 रोजी रात्री 8.30 वाजता देशविरोधी कारावाया करणार्या आठ दहशतवाद्यांच्या समूहाला वेढा देत त्यातील पाच दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला होता. असाधारण शौर्य व धैर्य दाखवल्याबद्दल तसेच या अतुलनीय कामगिरीबद्दल अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या उपस्थितीत सुभेदार मेजर शिवाजी घाडगे यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. आता भारतीय रेल्वेनेही त्यांच्या पराक्रमाचा अनोखा गौरव केला आहे. रेल्वेच्या डब्ल्यू ए.जी-9 एच सी या (लोको) रेल्वे इंजिनला त्यांचे नाव दिल्याने कामेरीसह अवघ्या जिल्ह्याचा उर भरुन आला आहे.
कामेरी ता.सातारा येथील शौर्य चक्र विजेते सुभेदार मेजर शिवाजी घाडगे सन 2007 साली सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले तर त्यांचे थोरले बंधू प्रकाश घाडगे यांनी सैन्यदलात देश सेवा केल्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक नाशिक या कंपनीत सेवा बजावली तर तिसरे बंधू जयवंत घाडगे हे शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. तर चौथे बंधू कामेरी गावचे विद्यमान पोलीस पाटील तानाजी घाडगे हे या गावची सेवा बजावत आहेत. हे घाडगे कुटुंबीय आज अखेर सेवाभावी तसेच मानसेवी सेवा बजावत असून आज अखेर एकत्रित कुटुंब पद्धती इतरांना प्रेरणादायी ठरत आहेत.