सातारा : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा पदभरती २०२३ समांतर आरक्षणात माजी सैनिक घटकांतील उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त आहेत. अशा जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनही करण्यात आले. दरम्यान,संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या धरणे आंदोलनात चंद्रकांत नागावकर, भाऊसाहेब काळोखे, संजय नीतनवरे, आशिष गोडबोले, संतोष खुडे, अमित सांगडे, सोनाली पवार, आरती गावडे, प्राजक्ता चांगण आदी सहभागी झाले होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात जिल्हा परिषदेतील विविध पद भरती (सरळसेवा) च्या अंतर्गत अनेक पदांसाठी सर्व संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. या यादीत जिल्हा परिषदेच्या माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे ही सर्व पदे रिक्त आहेत. माजी सैनिक उमेदवार न मिळाल्याने रिक्त जागा रुपांतरित करून गुणवत्तेच्या आधारे आणि शासन नियमाप्रमाणे तत्काळ भराव्यात. कारण, आतापर्यंत राज्यातील नाशिक, गडचिरोली, अमरावती या जिल्हा परिषदांनी माजी सैनिक उमेदवार न मिळाल्याने सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेनुसार रुपांतरित करून जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेतही नियुक्ती करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.