कराड मध्ये भर दिवसा घरफोडी

पाच लाखांचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 15 January 2025


कराड : भर दुपारी कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. माजी नगराध्यक्षा सौ. उमा हिंगमिरे यांच्या मार्केट यार्ड परिसरातील घरात काल दुपारी चोरी झाली ती घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत उदय हिंगमिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्डमध्ये उदय हिंगमिरे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उदय हिंगमिरे हे त्यांच्या आॅफिसवर गेले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी उमा हिंगमिरे याही नोकरीच्या ठिकाणी गेल्या.

घराबाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उमा हिंगमिरे या घरी आल्या. तर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उदय हिंगमिरे घरी आले. त्यानंतर रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले.

मंगळवारी सकाळी उमा हिंगमिरे यांना संक्रांतीनिमित्त परिधान करण्यासाठी दागिने हवे असल्यामुळे त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पती उदय हिंगमिरे यांना दिली.

दोघांनी कपाटात पाहिले असता कपाटातील साडेपाच तोळे वजनाचे ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, २ तोळ्याचा १ लाख २० हजार रुपये किमतीचा नेकलेस आणि ६० हजार रुपये किमतीच्या एक तोळे वजनाच्या बांगड्या चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत पोलीसात फिर्याद दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोदार स्कूलची पर्यावरणाविषयी बांधिलकी
पुढील बातमी
पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्काराबाबत मोठा निर्णय

संबंधित बातम्या